प्रतापगडाच्या बुरुज पुनर्बांधणीमध्ये दगडांऐवजी चक्क कडप्प्याचा वापर

जावळी- सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले प्रतापगडावरील ध्वज बुरुजाच्या मुख्य भागाची सध्या पुनर्बांधणी सुरू केली आहे.मात्र या कामात दगडाऐवजी चक्क कडप्प्याचा वापर होत आहे. यामुळे इतिहासप्रेमी आणि प्रतापगड ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत हे काम बंद पाडले आहे.
किल्ले प्रतापगडचा जागतिक वारसा स्थळांच्या नामांकन यादीमध्ये नुकताच समावेश झाला आहे.त्यामुळे किल्ले प्रतापगडावर होणारी सर्व कामे पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून होण्याची गरज असताना किल्ले प्रतापगडचा समावेश केंद्र व राज्य संरक्षित स्थळांच्या यादीमध्ये नसल्याने निधीअभावी काम रखडलेले होते.पडझड झालेल्या ध्वज बुरुजाचे काम मागील दोन वर्षांपासून ‘सह्याद्री प्रतिष्ठान’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून लोकवर्गणीतून खासगी ठेकेदार करत आहे.
हे काम करताना ठेकेदाराचे मजुर दगडांऐवजी कडाप्पा बसवत आहेत.त्यामुळे किल्ल्याचे मूळ सौंदर्य लोप पावणार आहे. त्यामुळेच या चुकीच्या पध्दतीने सुरू असलेल्या कामकाजाला विरोध करत शिवप्रेमींनी हे कामच बंद पाडले.
या किल्ल्यावरील मूळ बांधकामाला ३६८ वर्ष झाली आहेत.यामुळे किल्ल्यावरील तटबंदी, बुरुज, बांधकाम पावसात भिजून व हवामानातील बदलामुळे ढासळत आहे. दोन वर्षांपूर्वी ध्वज बुरुजाचा काही भाग ढासळला.या कामासाठी सह्याद्री प्रतिष्ठानने परवानगी घेत खासगी ठेकेदाराकडून काम सुरू केले. जुन्या दुर्मीळ कामाचा अनुभव नसल्याने या ठेकेदाराकडून नियमबाह्य काम केले जात होते. याबाबत ग्रामस्थांकडून या संस्थेकडे तक्रारी करण्यात येत होत्या. मागील दोन वर्षांपासून हे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top