प्रस्तावित सौरऊर्जा प्रकल्प रद्द करा! मच्छिमार बांधवांचे आमरण उपोषण

छत्रपती संभाजीनगर- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील नाथसागर धरण परिसरात केंद्र व राज्य शासनाच्या वतीने प्रस्तावित सौरऊर्जा प्रकल्प तातडीने रद्द करण्यात येऊन केंद्रशासनाच्या अधीन असलेल्या एनटीपीसी कंपनीला दिलेले काम तात्काळ थांबविण्याची मागणीसाठी हजारो मच्छीमार बांधवांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. पैठण शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर उपोषण सुरु असून यात मच्छिमारांची कुटुंबेही सहभागी झाली आहेत. या प्रकल्पासाठी पुढाकार घेणारे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचा निषेध करून उपोषणाला प्रारंभ करण्यात आला.
नाथसागर धरण आणि परीक्षेत्र हे पक्षी अभयारण्य म्हणून १९८६ ला घोषित झाले आहे. नाथसागर परिसरात इको सेन्सिटिव्ह झोन असल्यामुळे नाथसागर पक्षी अभयारण्याभोवती पर्यावरण संवेदनशील क्षेत्राची अंतिम अधिसूचना पर्यावरण व वन मंत्रालयाने जारी केली आहे. अभयारण्याची सीमारेषा ५०० मीटरपर्यंत असून, ते एकूण १४१ किलोमीटर क्षेत्रापर्यंत विस्तारलेले आहे. आता या क्षेत्रात बांधकाम, मशीन आणि विविध कृतींना बंदी घालण्यात आली आहे. या सौरऊर्जा प्रकल्पाने काही वाईट परिणाम होतील. अन्न नसल्याने स्थलांतरित पक्षी येणार नाहीत शिवाय येथील पक्ष्यांच्या अधिवासाची जागा घटून धरण परिसरातील जैवविविधता संपुष्ट येईल. दरम्यान, नाथसागर जलाशयात शेवगाव, नेवासा व स्थानिकसह जालना जिल्ह्यातील अंबड, पाथरवाला, शहागड, गांदी, राक्षसभवन येथील मच्छीमार कुटुंब उदरनिर्वाह करतात. या प्रकल्पामुळे २० हजार कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल. वनविभाग, पाटबंधारे विभाग, जलसिंचन विभागाने धरण क्षेत्रातील या प्रस्तावास परवानगी देऊ नये व सौरऊर्जा प्रकल्प तातडीने रद्द करण्यात यावा, अशी मागणी आंदोलनाद्वारे करण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top