फडणवीसांनी मणिपूरला जावे! जाण्या-येण्याचा खर्च मी करेन- उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली- देवेंद्र फडणवीस यांनी मणिपूर आणि लडाखला जावे, त्यांच्या जाण्या-येण्याचा, हॉटेलचा सर्व खर्च मी करेन. त्यांनी अरुणाचल प्रदेश आणि दार्जिलिंगला जावे, काश्मिरी पंडितांना भेटावे, त्यांचा जाण्या-येण्याचा सर्व खर्च करण्यास मी तयार आहे, अशी टीका आज ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली. संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आयोजित पत्रकार परषदेत उध्दव ठाकरे बोलत होते. उद्धव राहुल गांधी यांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट बघायला यावे. मी त्यांच्यासाठी आख्खे थिएटर बुक करेन, असे वक्तव्य उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते, त्याला ठाकरेंनी पस्पर उत्तर दिले.
देवेंद्र फडणवीस यांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी हजेरी लावली होती. राहुल गांधींनी हा चित्रपट पाहावा, मी त्यांच्यासाठी माझ्या स्वतःच्या खर्चाने थेअटर बुक करुन देतो, असे म्हणत यावेळी फडणवीसांनी राहुल गांधींवर टीका केली. त्यांच्या या टीकेला उत्तर देताना उध्दव ठाकरे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचा येण्या-जाण्याचा, राहण्या-खाण्याचा खर्च मी स्वतः करतो, पण त्यांनी मणिपूर आणि लडाखला जाऊन यावे. त्यांनी मणिपूर आणि लडाखला जाऊन तेथील परिस्थिती पाहावी. अरुणाचल प्रदेश आणि दार्जिलिंगला जावे, काश्मिरी पंडितांना भेटावे. बॉयकॉट बॉलीवूड म्हणणारे बॉलीवूडच्या नादी लागले आहेत. त्यामुळे एखादा प्रोड्युसर घेऊन त्यांनी मणिपूर फाईल्स चित्रपट काढावा.
उध्दव ठाकरे असेही म्हणाले की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आमच्याकडे आले होते. आपण भाजपाच्या आणि हुकुमशाहीच्या विरोधात लढले पाहिजे, असे त्यांनी आम्हाला सांगितले होते. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आली. निवडणुक रोख्यांचे बिंग फुटल्यामुळे केजरीवालांना अटक करून लक्ष विचलित करण्याचा सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न केला जात आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या वेळेचा भाजपा पक्ष वेगळा होता. आता वेगळा आहे. आता भ्रष्ट असलेले सर्व लोक भाजपासोबत आले आहेत. भाजपाने अजित पवार, नवाव मलिक, प्रफुल्ल पटेल यांना ठग म्हटले होते. पण आता तेच नेते भाजपासोबत आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेनेमधील सर्व ठग भाजपामध्ये गेल्याने आता आम्ही ठगमुक्त झालो आहोत. भष्ट्राचाऱ्यांना सोबत घेऊन केलेली युती नैसर्गिक कशी? मविआमध्ये आमचे सगळे बरे सुरू आहे. जागावाटपाबाबत भांडणे नाहीत. जागावाटपाबाबत खेचाखेच सुरू आहे. जागावाटपावर थोडी खेचाखेच होतेच, भाजपसोबत आमची युती होती, तेव्हासुद्धा खेचाखेची व्हायची. महाविकास आघाडीमध्ये आमची बोलणी झालेली आहेत. अंतिम निर्णय लवकरच होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top