बदलत्या वातावरणामुळे देवगडात मासळी टंचाई

देवगड – बदलत्या वातावरणामुळे देवगडच्या समुद्रामध्ये मासळी मिळण्याचे कमी झाले आहे. मासळीची टंचाई जाणवत आल्याने मासळीचे दर वधारले आहेत. तसेच किनारपट्टीवर वाहणार्‍या जोरदार वार्‍यामुळे मासेमारीमध्ये मोठ्या अडचणी येत आहेत.

वातावरण सातत्याने बदलत असल्याने काही छोटे मच्छीमार समुद्रात मासेमारीसाठी जाण्याचे टाळत आहेत. मोठ्या ट्रॉलरलाही मासळी मिळण्याचे प्रमाण तुलनेत कमी झाले आहे. यामुळे काहीवेळा मिळणारी मासळी आणि मासेमारीवर होणारा संभाव्य खर्च याचा ताळमेळ बसणे अवघड बनत असल्याचे मच्छीमार सांगत आहेत. मासळी लिलावाच्या जागीही काही ठराविक वेळीच मासळीचा लिलाव चालतो. वातावरणातील बदलाबरोबरच अन्य काही कारणामुळेही मासळी मिळण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे मच्छीमार सांगत आहेत.

मासळी मिळण्याचे प्रमाण कमी झाल्याने बाजारात मासळीची आवक मंदावली आहे. त्यामुळे खवयांना मासळी चढ्या दराने खरेदी करावी लागत आहे. येथील अर्थव्यवस्था मासळीवर अवलंबून असल्याने मासळीची आवक आणखी मंदावल्यास त्याचा एकूणच बाजारपेठेच्या उलाढालीवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यातच अरबी समुद्रात मासेमारीला येणार्‍या परप्रांतीय नौकांची संख्या अलीकडे वाढली आहे. या नौका हायस्पीड असतात. त्यामुळे जिल्ह्यातील मच्छीमारी नौकांना मासळी मिळण्यावर काहीसा परिणाम जाणवत असल्याचे काही मच्छिमार सांगत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top