बांधकामावरील सळई डोक्यात पडल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू

पुणे

पुण्याच्या बाणेर परिसरात गृहप्रकल्पाचे काम सुरू असताना लोखंडी सळई डोक्यात पडून पादचारी शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. रुद्र केतन राऊत (वय ९) असे मृत्यू झालेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे. या प्रकरणी बांधकाम व्यवसायिकासह अभियंत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बाणेर येथे गणराज चौकाजवळ मुख्य रस्त्यावर केतन वीरा बिल्डरचे बांधकाम सुरू आहे. काल दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान काम सुरू असताना इमारतीवरून सळई मुख्य रस्त्यावर पडली. शाळेतून घरी जाणाऱ्या रुद्रच्या डोक्यात सळई पडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत रुद्रची आई पूजा केतन राऊत यांनी पुण्यातील चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार गृहप्रकल्पाचे संचालक बांधकाम व्यावसायिक आणि अभियंत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी बांधकांम सुरू असलेल्या इमारतीची पाहणी केली. तेव्हा तेथे सुरक्षाविषयक उपाययोजना केल्या नसल्याचे आढळले. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या परिसरात जाळी बसविण्यात आली नव्हती. सुरक्षाविषयक उपाययोजना न करता दुर्घटनेस जबाबदार ठरलेल्या बांधकाम व्यवसायिकासह अभियंत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top