बीड, नगर, पुणे हायवेमार्गे मराठा मोर्चा मुंबईत! मार्ग जाहीर

छत्रपती संभाजीनगर – मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईत धडकणार्‍या मराठ्यांच्या महामोर्चाचा मार्ग आज जाहीर केला. 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून पायी मोर्चा मुंबईकडे निघणार आहे. बीड, नगर, पुणे महामार्गाद्वारे तो मुंबईकडे प्रस्थान करणार आहे. या मोर्चासाठी काय आणि कशी तयारी करायची आहे, याचीही माहिती जरांगे-पाटील यांनी दिली. सर्वांना आरक्षण मिळाल्याशिवाय माघारी फिरायचे नाही, असे आवाहनही त्यांनी मराठ्यांना केले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जरांगे-पाटील म्हणाले की, देशात कुणी अशी धडक मारली नसेल, तशी धडक मुंबईत मारा. आतापर्यंत 54 लाख मराठ्यांना आरक्षण मिळाले आहे. आता सर्वांना आरक्षणाशिवाय माघारी फिरायचे नाही. आरक्षणासाठी मराठा बांधवांनी घरात न थांबता, मुंगीसारखे बाहेर पडून मुंबईकडे कूच केले पाहिजे. आपण सरकारला आतापर्यंत खूप संधी दिली आहे. आपल्या लेकरांसाठी हा लढा द्यायचा आहे. त्यामुळे कुणीही घरात बसू नका. यावेळी आरक्षण घेऊनच परत यायचे आहे. मराठा आरक्षणासाठी जाणार्‍या मोर्चात सहभागी होणार्‍या मराठा समाजाने सोबत काय वस्तू आणाव्यात, याची सविस्तर माहितीदेखील जरांगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, पायी चालताना मध्ये-मध्ये वाटेत जी गावे येतील, तिथे आपले बांधव व्यवस्था करतीलच, पण कुणावर अवलंबून राहायचे नाही. जे लागेल ते सर्व सामान सोबत घ्या. तुमचे वाहन हेच तुमचे घर असणार आहे. वाहनात झोपायची सोय करा. आतील सीट काढा, जिथे थांबाल तिथे चूल मांडायची, अन्न शिजवायचे, खायचे आणि पुढे जायचे. धान्य, पाणी, चटई, स्वेटर, औषधे, चूल, कोरडे खाद्यपदार्थ, टॉर्च, मोबाईल चार्जर, कपडे, साबण, दूध पावडर, सरपण, तवा, पातेले अशा ज्या वस्तू लागतात त्या सर्व वस्तू सोबत ठेवा. ऊसतोड करायला चाललो समजून सर्व संसार सोबत घ्या. गाड्या तुमच्या बरोबर ठेवा. गाडी पुढे गेली आणि तुम्ही मागे राहिले असे करू नका. जो खर्च लागेल तो तुम्ही वाटून करा.
भजन करणारी मंडळी, टाळकरी मंडळी, हलगी पथक, पोवाडे म्हणणारे, शिवशाहीर किंवा शिकणारे शिवशाहीर असतील त्यांनी मनोबल वाढविण्यासाठी सोबत यावे. जागरण गोंधळ करणारे, भारुडकार यांनी सोबत यावे, हॉटेल चालक ‘ना तोटा ना नफा’ या तत्त्वावर स्टॉल टाकत असेल तर चालेल. सरकारने मुंबईत फक्त आंघोळीची आणि प्रातःर्विधीची सोय करावी, असे जरांगे म्हणाले. मुंबईत आम्ही ज्यांना ओळखतो त्या सर्वांना संपर्क करीत आहोत, पण मुंबईत ओळखीचे नाहीत असे अनेकजण आहेत. त्यांच्याशी संपर्क झाला नाही तरी त्यांनी मदत करायला यावे ही विनंती आहे. उद्या आपली टीम मुंबईत आझाद मैदान, शिवाजी पार्क, बीकेसी मैदानाची पाहणी करणार आहे. मुंबईतील लोकांनी त्यावेळी उपस्थित राहावे. तुमच्या मदतीची गरज आहे.

अंतरवाली ते मुंबई मोर्चा-मार्ग
अंतरवालीतून (जालना) शहागड मार्गे-गेवराई (बीड)-पाडळशिंगी-मादळमोई-तांदळा मातुरी मार्गे खरवंडी (नगर जिल्हा)-पाथर्डी-तिसगाव -करंजी घाट-अहमदनगर-केडगाव-सुपा-शिरुर (पुणे) -शिक्रापूर-रांजणगाव-वाघोली-खराडीबायपास-चंदननगर-शिवाजीनगर-पुणे-मुंबई हायवे-लोणावळा-पनवेल (नवी मुंबई) -वाशी-चेंबूर-आझाद मैदान(मुंबई)-दादर-शिवाजी पार्क (मुंबई)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top