बोगद्यात अडकलेल्या कामगारांना अन्नापेक्षा प्राणवायूची जास्त गरज

डेहराडून – उत्तरकाशीच्या सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या ४० कामगारांना अन्न पदार्थांपेक्षा प्राणवायूची गरज आहे. त्यामुळे प्राणवायू पुरवठा विनाअडथळा सुरू ठेवा, अशी मागणी अडकलेल्या कामगारांनी केली आहे. या मागणीनंतर कामगारांना निरंतर प्राणवायू पुरवठा करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. बचावकार्य करणारे कर्मचारी सातत्याने कामगारांच्या संपर्कात आहेत.बोगद्यात ४० कामगार अडकले त्याला ५० तासांहून अधिक काळ झाला आहे. एसडीआरएफ कमांडंट मणिकांत मिश्रा यांनी कामगारांशी संपर्क साधला. कामगारांना वाचवण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान काल अडकलेल्या कामगारांसोबत संपर्क तुटला होता. त्यामुळे सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पुन्हा त्यांच्याशी संपर्क झाला. सर्व कामगार सुखरूप आहेत, अशी माहिती पीआरडी जवान रणवीर सिंह चौहान यांनी दिली. सरकारकडून या बोगद्याची जबाबदारी एनएचआयडीएसीएल कंपनीला देण्यात आली आहे. या बोगद्याचे बांधकाम नवयुग या कंपनीकडे आहे. बोगद्याच्या आतून २१ मीटपर्यंतचा ढिगारा उपसण्यात आला . अजूनही १९ मीटपर्यंत ढिगारा पडलेला आहे. सर्व कामगार सुखरूप आहेत. एनएचआयडीसीएलच्या ज्या पाईपलाईनमधून पाणी आणि प्राणवायू पुरवला जातो त्याद्वारचे आम्ही कामगारांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. अडकलेल्या कामगारांपैकी फक्त एकच उत्तराखंडचा रहिवासी आहे. उर्वरित कामगार बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, झारखंड, ओडिशा आणि हिमाचल प्रदेशातील आहेत, असे एनएचआयडीसीएलचे कार्यकारी संचालक कर्नल (निवृत्त) संदीप सुधेरा यांनी सांगितले.

अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडून उत्तरकाशीतील घटनेची माहिती घेतली. पंतप्रधानांनी मुख्यमंत्री धामी यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. मजुरांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र दुर्घटनास्थळी स्थानिक नेते वारंवार येत असल्यामुळे या मदतकार्यात अडथळा येत आहे, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी जी. एल. नाथ यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top