भारताने बांगलादेशला ५६ एकर जमीन दिली

नवी दिल्ली

बांगलादेशच्या लोकांनी याला ईद गिफ्ट म्हटले आहे. भारताने सीमावर्ती ठाकूरगावच्या राणीशंकोई उपजिल्हामधील ५६.८६ एकर जमीन बांगलादेशला दिली आहे. याच्या बदल्यात भारतानेही बांगलादेशकडून १४.६८ एकर जमीन घेतली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात ५० वर्षांनंतर ही जमिनीची देवाणघेवाण झाली. भारत-आणि बांगलादेश यांच्यामध्ये ४०९६ किमी लांबीची आंतराष्ट्रीय सीमा रेषा आहे. आसाम, त्रिपूरा, मिझोरम, मेघालय आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांना बांगलादेशची सीमा लागून आहे.

भारताकडून बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (बीएसएफ) आणि बांगलादेशकडून बॉर्डर गार्ड बांगलादेश (बीजीबी) यांच्यात ध्वज बैठकीत जमिनींची देवाणघेवाण झाली. याआधी १९७४ मध्ये भारत आणि बांगलादेशमध्ये जमिनीच्या देवाणघेवाणीचा करार झाला होता, मात्र राणीशंकोईबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. भारताकडून बांगलादेशला मिळालेल्या जमिनीला सरकारी जमीन म्हटले जाईल. या जमिनीपैकी ४८.१२ एकर शेती, ६.८७ एकर चहाच्या मळ्याखाली आणि १.८७ एकर जमीन लागवडीखाली आहे. बीजीबी कॅप्टन लेफ्टनंट कर्नल तंजीर अहमद यांनी म्हटले की, दोन्ही देशांमधील जमिनीची देवाणघेवाण सौहार्दपूर्ण पद्धतीने झाली आहे. आम्हाला ईदची भेट मिळाली. यासाठी आम्ही बीएसएफचे आभार मानतो. आत्तापर्यंत आम्ही भारताच्या या भागात आमच्या जमिनीबद्दल वडिलांकडून ऐकायचो, आता आम्हाला तिथे शेती करता येणार आहोत. बांगलादेशातील इतर ८ जिल्ह्यांमध्ये जमिनीच्या वितरणासाठी सर्वेक्षण प्रस्तावित आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये जमिनीचे वाटप होऊ शकेल. बीएसएफ, बीजीबीसह इतर एजन्सीही या सर्वेक्षणात सहभागी होणार आहेत. हे सर्वेक्षण वर्षअखेरीस पूर्ण होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top