भारतीय सिनेमाचे भविष्य सामान्य नागरिक ठरवतील – जावेद अख्तर यांचे प्रतिपादन

छत्रपती संभाजीनगर : “आर. बाल्की आणि अनुभव सिन्हा यांच्यासह आणखी काही बोटांवर मोजण्याइतके दिग्दर्शकांनी संवेदनशीलता जपत सामाजिक संदेश देणारे चित्रपट बनवले आहेत. या प्रकारचे चित्रपट बनविणाऱ्या दिग्दर्शकांसमवेत प्रेक्षक किती काळ आणि कधीपर्यंत सोबत असतील यावर भारतीय सिनेमाचे भविष्य ठरेल,” असे प्रतिपादन गीतकार पद्मभूषण जावेद अख्तर यांनी यावेळी केले. जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी गीतकार जावेद अख्तर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. गीतकार जावेद अख्तर म्हणाले की, “समकालीन काळात चित्रपट बनवणाऱ्यापेक्षा चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण असून कोणत्या प्रकारचे चित्रपट बनतील आणि कोणत्या प्रकारचे चित्रपट बनणार नाहीत. याची जबाबदारी लोकांवर आहे. त्याचप्रमाणे आजच्या चित्रपटात मूल्य, नैतिकता आणि कोणत्या प्रकारचे संस्कार असतील हे सामान्य नागरिक ठरवतील.” दरम्यान, अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात भारतीय सिनेमातील अतुल्य योगदानाबद्दल प्रसिध्द गीतकार व पटकथाकार पद्मभूषण जावेद अख्तर यांना यावर्षीचा ‘पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top