मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या पॅलेस्टिनींवर इस्रायलचे हल्ले५६ नागरिक ठार

जेरुसलेम :

इस्रायली सैन्याने मागील २ दिवसांत गाझा पट्टीमध्ये मदत वितरण केंद्रांवर ५ वेगवेगळे हल्ले केले. या हल्ल्यात ५६ लोक ठार झाले असून ३०० हून अधिक जखमी झाले आहेत, असा दावा पॅलेस्टाईनने केला आहे.

गुरुवारी गाझा पट्टीमध्ये दोन वेगवेगळ्या इस्रायली हल्ल्यांमध्ये मदतीच्या प्रतीक्षेत असलेले २९ पॅलेस्टिनी ठार झाले होते, तर १५० हून अधिक लोक जखमी झाल्याचे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले. पहिली घटना मध्य गाझा पट्टीतील अल-नुसीरत केंद्रामध्ये घडली. येथील एका छावणीवर झालेल्या हवाई हल्ल्यात ८ जण ठार झाले. दुसऱ्या घटनेबाबत, गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, उत्तर गाझा चौकात मदत ट्रकची वाट पाहत असलेल्या जमावावर इस्रायली सैन्यांनी गोळीबार केला. यामध्ये २१ लोक ठार झाले आणि १५० हून अधिक जखमी झाले. त्यानंतर गेल्या ४८ तासांत इस्रायलने मदत केंद्रांवर केलेल्या हल्ल्यात सुमारे ५६ लोक मारले गेले आहेत.

गाझा आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते, इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत ३१ हजाराहून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. तर ७१,५०० हून अधिक जखमी झाले आहेत. या युद्धात हमासचे किमान १३ हजार दहशतवादी मारले गेल्याचे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top