मर्चंट नेवी खलाशी अंकित सकलानी तुर्कस्तानच्या जहाजातून बेपत्ता

डेहराडून :

मर्चंट नेव्ही खलाशी अंकित सकलानी तुर्कस्तानला जाणाऱ्या जहाजातून बेपत्ता आहे. त्याने आत्महत्या केल्याचे तो काम करत असलेल्या अल्विस शिप मॅनेजमेंट कंपनीचे म्हणणे आहे, तर अंकितच्या पत्नीने आरोप केला आहे की, ‘अंकितला घरी परतायचे होते. त्याला काही झाल्यास कंपनी जबाबदार असेल’, या प्रकरणी अंकितच्या कुटुंबीयांनी उत्तराखंड सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.

अंकित जहाजातून तुर्कस्तानला जात होता. अंकित सकलानीची पत्नी पिंकी यांनी सांगितले की, तिचा नवरा मुंबईस्थित अल्विस शिप मॅनेजमेंट कंपनीत काम करतो. १ डिसेंबर रोजी कंपनीत रुजू झाला होता. त्यानंतर तो १८ डिसेंबरपासून बेपत्ता आहे. कंपनीत रुजू झाल्यानंतर १० दिवसांनी अंकितने तिला विचित्र संदेश पाठवण्यास सुरुवात केली आणि त्याला परत यायचे आहे, असे तो म्हणत होता. ११ डिसेंबर रोजी त्याने मेसेज पाठवला होता की त्याला काही झाले तर त्याला कंपनी जबाबदार असेल. याबाबत पिंकीने मुंबईतील एका फर्मशी संपर्क साधला. या फर्मच्या दोन एजंटने अंकितला अल्विस शिप मॅनेजमेंट कंपनीत भरती केले होते. एजंटने पिंकीला सांगितले की, जहाज सध्या मार्गात आहे त्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकणार नाही. १८ डिसेंबरला जहाज तुर्कीच्या बंदरात पोहोचल्यानंतरच बोलणे शक्य होईल. कंपनीकडून आश्वासन मिळाल्यानंतर पिंकी निश्चिंत झाली. पण त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता तिला कंपनीकडून फोन आला की जहाज बंदरावर पोहोचण्या अगोदर तिच्या पतीने जहाजातून उडी मारली आहे.

अंकितच्या भावाने उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. याशिवाय कुटुंबाने तुर्कीच्या दूतावासालाही या घटनेबाबत पत्र लिहिले आहे. अंकित सकलानी हा देहरादूनचा रहिवासी असून त्याला चार वर्षांची मुलगी आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top