महाराष्ट्रभर वंचित आघाडीचे उमेदवार उभे करणार! प्रकाश आंबेडकरांची घोषणा

नागपूर- आम्ही महाराष्ट्रभर आमचे उमेदवार उभे करणार आहोत. आम्ही जाहीर करतो की महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात आम्ही निवडणूक लढवणार आहोत. वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय मुद्द्यांसह इतर मुद्यांना सोबत घेऊन लोकसभेची निवडणूक लढवणार आहे, अशी घोषणा आज प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. आंबेडकर आज नागपूर दौऱ्यावर होते. तेथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आंबेडकर म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये परस्पर समन्वय नाही. महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांत आपापसात एकमत झाले नाही. तिन्ही पक्षांच्या वेगवेगळ्या याद्या बाहेर येत आहेत. महाविकास आघडीत ज्या मतदारसंघात मतभेद होते, ते मतभेद अजूनही कायम आहेत. याच कारणामुळे मैत्रीपूर्ण लढतीची चर्चा चालू आहे. म्हणूनच अगोदर तुमचे भांडण मिटवा असे आम्ही त्यांना सांगत होतो. पण त्यांच्यातील भांडण मिटत नसल्याने ते वंचितला दोष देत होते. विस्थापित आणि प्रस्थापित यांचा समन्वय गरजेचा आहे. विस्थापित नेत्यांना सामावून घेऊ असे आम्ही त्यांना सांगितले होते. मात्र याला महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा नकार होता. त्यामुळेच ते आम्हाला दोन आणि तीन जागा देऊ असे सांगत होते. त्यामुळे आता आम्ही जाहीर करतो की महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात आम्ही निवडणूक लढवणार आहोत. आता निवडणूक जवळ आली आहे. आम्ही या निवडणुकीची तयारी केली होती.आम्ही आता महाराष्ट्रभर आमचे उमेदवार उभे करणार आहोत. अनेक मतदारसंघात भाजपा आणि वंचितमध्ये लढत असेल.
आंबोडकर पुढे म्हणाले की, निवडणूक रोखे हा विषय निवडणुकीत महत्त्वाचा राहील. वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय मुद्द्यांसह इतर मुद्यांना सोबत घेऊन लोकसभेची निवडणूक लढवणार आहे. आम्ही काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते. त्यापैकी कोल्हापूर आणि नागपूर या दोन जागांवर आम्ही काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे. आणखी पाच जागांवर आम्ही काँग्रेसला पाठिंबा जाहीर करू. राहुल गांधी यांच्या मुंबईतील सभेत मी अनेक गोष्टी मांडू शकतो आणि त्यामुळे त्यांची अडचण होऊ शकते त्यामुळे मला पाचच मिनिटे देण्यात आली. भाजपा, संघ यांना अंगावर घेण्याची आमची ताकद आहे. जरांगेंनी त्यांच्या निर्णय घेतला आहे. आम्ही त्यांच्या निर्णयाचे स्वागत करतो. भाजपाला आम्ही कधीच पाठिंबा दिला नाही. भाजपात चर्चा चालू आहे, लोकसुद्धा विचारत आहेत की, एवढ्या सगळ्या संघटनांना सोबत घेण्याची त्यांना गरज का आहे. ज्या मतदारसंघात ते लढत आहेत, त्यात त्यांचे प्राबल्य आहे. पण ज्या मतदारसंघात ते लढलेले नाहीत, ज्यात त्यांचे प्राबल्य नाही, त्या मतदारसंघातील प्राबल्य मिळावे म्हणून उमेदवार पळवले जात आहेत. पक्षफोडले जात आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top