मालेगाव बॉम्बस्फोटातील फरार आरोपीची मालमत्ता जप्त करा

मुंबई – मालेगावात २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपी रामचंद्र कालसंग्रा याची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने काल दिले. वॉरंट तसेच फरार घोषित केल्यानंतरही आरोपी न्यायालयात हजर राहिला नाही. या पार्श्वभूमीवर विशेष एनआयए न्यायालयाचे न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी मध्य प्रदेशातील शहजानपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना कालसंग्राची मालमत्ता जप्तीची कारवाई करण्याचे आदेश दिले.
२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगाव येथे मशिदीजवळ बॉम्बस्फोट झाला होता. त्यात ६ लोकांचा मृत्यू, तर १०० हून अधिक जण जखमी झाले होते. या प्रकरणात भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्यासह एकूण १३ आरोपी होते. त्यातील ५ आरोपींची सुटका झाली आहे, तर रामचंद्र गोपालसिंग कालसंग्रा आणि संदीप डांगे हे दोघे फरार आहेत. कालसंग्राविरुद्ध विविध बॉम्बस्फोट प्रकरणांत गुन्हे दाखल आहेत. समझोता एक्स्प्रेसमधील बॉम्बस्फोट, २००६ मधील मालेगाव बॉम्बस्फोट आणि २००७ मधील हैदराबादच्या मक्का मशिदीत झालेल्या बॉम्बस्फोटात कालसंग्राचा सहभाग होता, असा आरोप आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एनआयएचे विशेष सरकारी वकील अविनाश रसाळ आणि अनुश्री रसाळ हे काम पाहत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top