मुंबईच्या रस्त्यांची दुरुस्तीसाठी तिसऱ्यांदा निविदा काढल्या

मुंबई :

शहर भागातील रस्त्यांची कामे यंदा पावसाळ्यापूर्वी सुरू होऊ शकणार नाहीत. या कामांसाठी पालिकेने आता तिसऱ्यांदा निविदा मागवल्या आहेत. सुमारे १,३६२ कोटी रुपयांच्या कामासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्षात कामे सुरू होण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे ही कामे पावसाळ्यापूर्वी सुरू होण्याची शक्यता कमी आहे.

मुंबईतील शहर भागातील रस्त्यांच्या सिमेंट कॉंक्रिटीकरणाची कामे गेल्या वर्षभरापासून वादात सापडली आहेत. त्यानंतर रखडलेल्या या कामांसाठी काढलेल्या फेरनिविदांचा प्रकरण न्यायालयात पोहोचले. त्यामुळे रस्त्यांची कामे होऊ शकली नाहीत. रखडलेल्या कामांसाठी नव्याने निविदा प्रक्रियाही राबवता आली नाही. पालिकेच्या रस्ते विभागाने १ फेब्रुवारी रोजी रस्त्यांच्या कामांसाठी मागवलेल्या निविदांना प्रतिसाद न मिळाल्यामुळे पुन्हा एकदा निविदा मागविण्यात आल्या आहेत. ५ एप्रिलपर्यंत या कामासाठी निविदा सादर करता येणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला येत्या दोन वर्षात मुंबईतील रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ६,०७८ कोटींच्या कामांसाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. या कामांसाठी ५ नामांकित कंत्राटदारांची निवड करण्यात आली व जानेवारी महिन्यात कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आले होते. जानेवारी २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रस्त्याच्या कामांचे भूमीपूजन करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात ही कामे सुरूच होऊ शकली नाहीत . त्यामुळे पालिकेने नवीन कंत्राटदार नेमण्याकरीता निविदा मागवल्या आहेत. या कामासाठी निविदा मागवण्याची आता ही तिसरी वेळ आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top