मुंबई महापालिकेच्या ठेवींमध्ये वर्षभरात १० हजार कोटींची घट

मुंबई- देशातील सर्वांत श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुंबई महापालिकेची तिजोरी रिकामी होऊ लागली आहे. गेल्या वर्षभरात महापालिकेच्या एकूण ठेवींमध्ये तब्बल १० हजार कोटींची घट झाली आहे. पालिकेच्या ठेवी ९२ हजार कोटींवरून ८२ हजार कोटींवर आल्या आहेत. केवळ शहरातील सुशोभीकरण आणि प्रभाग स्तरावर घेण्यात आलेल्या राजकिय बैठकांवर आता पर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

पुढील काही वर्षांत मुंबई महापालिकेची तिजोरी अशीच रिकामी होऊ लागली तर कर्मचाऱ्यांची देणी आणि विविध विकास प्रकल्प राबवणे अशक्य होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वास्तविक मुंबई महापालिकेचा काही वर्षांपर्यंत जकात हा मुख्य आर्थिक स्रोत होता. मात्र जकात बंद झाल्यानंतर पालिकेची आर्थिक कोंडी सुरू झाली. याच जकातीच्या बदल्यात ‘जीएसटी ‘ म्हणून पालिकेला केंद्राच्या माध्यमातून महिन्याला ९०० कोटी रुपये दिले जातात. मात्र, गेल्या दोन वर्षांत मालमत्ता करात वाढ न झाल्याने पालिकेला आर्थिक अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यातच कोस्टल रोड, गोरेगाव- मुलुंड लिंक रोड आणि समुद्राचे खारे पाणी गोडे करणे आदी प्रकल्प राबविले जात आहेत. त्यासाठी पालिकेला दरवर्षी आपल्या अर्थसंकल्पात तरतूद करावी लागत आहे. त्यामुळेच पालिकेला विविध बॅंकामधील मुदतठेवी मोडाव्या लागल्या आहेत. परिणामी ठेवीच्या रकमेत घट झाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top