मोठ्या हल्ल्यात युक्रेनचा उर्जानिर्मिती प्रकल्प नष्ट

किव- रशियाने नव्याने सुरु केलेल्या हल्ल्यांमध्ये युक्रेनच्या उर्जानिर्मिती केंद्रांना लक्ष्य करण्यात आले असून काल अनेक वीजनिर्मिती केंद्रांवर हल्ले करण्यात आले. या हल्ल्यात ट्रेप्लिस्का हे युक्रेनचे सर्वात मोठे वीजनिर्मिती केंद्र नष्ट झाले आहे. या उर्जानिर्मिती केंद्रामधून नजीकच्या किव, चेरेस्की व झायटोमायर भागाला वीजपुरवठा केला जात होता. हे वीजनिर्मिती केंद्र उद्धवस्त झाल्यामुळे या भागातील वीजपुरवठाही खंडित झाला आहे. या केंद्रातील ट्रान्सफॉर्मर, टर्बाईन व जनरेटर वर ठरवून हल्ले करण्यात आले. युक्रेनच्या प्रशासनाने ही माहिती दिली आहे.
पहिल्यांदा ड्रोनने कामगारांनाही लक्ष्य केले मात्र ते सुरक्षित ठिकाणी लपून राहिले. त्यानंतर लागोपाठ हल्ले करुन हा प्रकल्प पूर्णपणे उद्धवस्त करण्यात आला. या वीजनिर्मिती प्रकल्पातून ३० लाख ग्राहकांना वीजपुरवठा करण्यात येत होता. इतर ग्रीडमधून वीजपुरवठा करुन तो सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. खारखीव इथल्या वीजप्रकल्पावरही हल्ले करण्यात आले असून त्याचा फटका २ लाख लोकांना पडला आहे. रशियाच्या वीज निर्मिती केंद्रावरील हल्ल्यांमुळे युक्रेनमध्ये काळोखाचे साम्राज्य पसरले आहे. या हल्ल्यांच्या विरोधात युक्रेनने हवाई हल्ले प्रतिबंधक प्रणालीची मागणी केली असली तरी त्याचा पुरवठा धीम्या गतीने होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top