मोदींचे छायाचित्र प्रभू श्रीरामांपेक्षा मोठे! भाजपाच्या पोस्टरवरून नवीन वाद

मुंबई – कर्नाटक भाजपाने अयोध्येतील श्रीराम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. या छायाचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रभू श्रीरामांना हाताला धरून श्रीराम मंदिराच्या दिशेने नेत असल्याचे दिसत आहे. यात मोदींची प्रतिमा रामापेक्षाही उंच दाखवण्यात आली आहे. या छायाचित्रावरून मोदी सरकारवर विरोधकांनी निशाणा साधला आहे. भाजपाने मोदींना विष्णूचा तेरावा अवतार घोषित केल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
अयोध्येतील श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा 22 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. जसजशी ही तारीख जवळ येत आहे तसतसे देशभरातील वातावरण राममय होऊ लागले आहे. भाजपाकडून आता निमंत्रणाची धामधूम सुरू झाली आहे. कर्नाटक भाजपाने 22 जानेवारीच्या सोहळ्याच्या प्रसिद्धीसाठी एक पोस्टर एक्स हँडलवर पोस्ट केले. या छायाचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रभू श्रीराम यांची पाठमोरी प्रतिमा दिसते. समोर अयोध्येतील राम मंदिर दिसत आहे. मोदी श्रीरामाच्या हाताला धरून त्यांना मंदिराकडे घेऊन जात आहेत. विशेष बाब म्हणजे या पोस्टरमध्ये रामाची प्रतिमा लहान आणि मोदींची प्रतिमा उंच दाखवली आहे. यामुळे विरोधकांनी संतापून यावर टीकास्र सोडले. मोदींचे भक्त आता त्यांना प्रभू श्रीरामांपेक्षा मोठे समजू लागले आहेत का, विरोधकांनी असे काही केले असते तर अंधभक्तांनी आकांडतांडव केले असते, अशा प्रतिक्रिया सोशल माध्यमांवरही आहेत. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी एक्सवर पोस्ट करीत टीका केली की, हे पोस्टर पाहून ज्या हिंदूचे रक्त उसळणार नाही, ते रक्त नव्हे, पाणी असेल. कोट्यवधींचे आराध्य प्रभू श्रीरामांचा हा अपमान नव्हे का?
उबाठाचे खासदार संजय राऊत संतप्तपणे प्रतिक्रिया देत म्हणाले की, नरेंद्र मोदी हे प्रभू श्रीरामाचे बोट धरून त्यांना मंदिरात नेत असल्याचे दाखवणारी पोस्टर भाजपाने छापली आहेत, हा निर्लज्जपणा आहे. कोट्यवधी रामभक्तांच्या भावना दुखावणारे हे पोस्टर आहे. आम्ही सामान्य रामभक्त आहोत, म्हणून आम्ही अयोध्येच्या लढ्यात उतरलो होतो. आजचे हे व्हीआयपी तेव्हा कुठे होते? आमचा अयोध्या लढ्याशी संबंध नाही, आम्ही बाबरी पाडली नाही असे तेव्हा हे म्हणत होते, त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी गर्जना केली की, बाबरी पाडणारे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे. बाबरी पाडल्याचे खापर भाजपाने डरपोकपणाने, घाबरून शिवसेनेवर फोडले. ती जबाबदारी बाळासाहेबांनी घेतली तेव्हाच कळाले की, हिंदुत्वाच्या बाबतीत व्हीआयपी कोण आणि ढोंगी कोण आहे. राम मंदिराबद्दल आज जे बोलत आहेत त्यांना बोलू द्या. त्यांना जो इव्हेंट करायचा आहे तो करू द्या. भाजपाने नरेंद्र मोदींना भगवान विष्णुचा तेरावा अवतार घोषित केला आहे. रामाचा हात धरून ते त्यांना मंदिरात बसवणार आहेत असे ऐकले आहे. मंदिरात जाणारा हा भक्त असतो, पण या देशात मंदिरात जाणारा एकमेव व्हीआयपी म्हणजे नरेंद्र मोदी आहेत. हे भगवान विष्णूचे 13 वे अवतार प्रभू श्रीरामांचे बोट धरून मंदिरात नेत आहेत. दरम्यान, वादंग उठल्यावर कर्नाटक भाजपच्या एक्स हँडलवरून हे पोस्टर हटवण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top