युतीच्या जागावाटपाच्या वाढत्या गोंधळात अभिनेता गोविंदा शिवसेनेच्या पटलावर झळकला

मुंबई – महायुतीत जागावाटपावरून गोंधळ, रुसवेफुगवे, तणाव, बैठका असा खेळ सुरू असताना राजकारणात पूर्ण फेल गेलेला अभिनेता गोविंदाने त्याच्या उशिरा येण्याच्या जगजाहीर स्वभावानानुसार निवडणुकीच्या तोंडावर राजकारणात पुन्हा प्रवेश केला आणि तो शिवसेनेच्या पटलावर झळकला. गोविंदाला उमेदवारी नको, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारंवार सांगितले असले तरी गोविंदा पुन्हा उत्तर मुंबई मतदारसंघातून लढवणार अशी चर्चा आहे. गोविंदाच्या येण्याने सर्व पक्षांतील आयात उमेदवारांच्या संख्येत भर पडली आहे.
20 वर्षांपूर्वी भाजपाच्या राम नाईक यांचा पराभव करून राजकारणात चमकलेला आणि एका निवडणुकीनंतर राजकीय पटलावरून लुप्त झालेला बॉलिवूडचा तारा गोविंदाने आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन भगवा झेंडा हाती घेत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी नुकतेच शिवसेेनेत प्रवेश केलेले मिलिंद देवराही उपस्थित होते. या पक्षप्रवेशानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत गोविंदा म्हणाले की, 2004 ते 2009 मी खासदार होतो. बाहेर पडल्यावर पुन्हा या क्षेत्रात येईन असे वाटले नव्हते. 2010 पासून 2014 पर्यंत या 14 वर्षांच्या वनवासानंतर आता रामराज्य जिथे आहे त्याच पक्षात प्रवेश करतो आहे. आजच्या दिवशी मी पक्षात प्रवेश करणे ही मला वाटते की, देवाची कृपा आणि प्रेरणा आहे. पक्षात आल्यानंतर मी इमानदारीत जबाबदारी पार पाडेन, हे आश्वस्त करतो. मला कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रात काम करायला आवडेल. आपल्या देशात चित्रपट असो किंवा चित्रकूट असो, ते कला आणि संस्कृतीचीच प्रतीक आहेत. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. साहित्य आणि संस्कृतीला महत्त्व देणारी ही भूमी आहे. बॉलिवूडला जन्म देणारी ही भूमी आहे. फिल्मसिटी जागतिक स्तरावर जाऊन पोहोचली आहे. आख्ख्या जगात नाव असलेली ही मॉडर्न अशी फिल्मसिटी आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची माझ्यावर चांगली कृपा होती. माझ्या आई-वडिलांपासून बाळासाहेब ठाकरेंशी आमचे चांगले संबंध होते. त्यानंतर आता त्यांच्याच पक्षात मी अशा पद्धतीने येईन याचा मी कधी विचार केला नव्हता, असे सांगत गोविंदाने मुख्यमंत्री शिंदे यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, आम्ही सुरुवातीला जी मुंबई पाहायचो, ती आता आणखी सुंदर दिसते आहे. विकास दिसतो आहे. सौंदर्यीकरण दिसते आहे, एकनाथ शिंदे आल्यापासून मुंबईत हवा, रस्ते, सौंदर्यात मोठी भर पडली आहे.
या प्रवेशावेळी एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले की, आज शिवजयंतीच्या अत्यंत पवित्र दिनी आपले सगळ्यांचे लाडके आणि लोकप्रिय अभिनेते गोविंदा हे शिवसेनेत आले आहेत. मी त्यांचे मनापासून स्वागत करतो. डाऊन टू अर्थ असलेले आणि सगळ्यांना आवडणारे गोविंदांना शुभेच्छाही देतो. गोविंदा सरकारचे काम बघून शिवसेनेत आले आहेत. मला भेटल्यावर त्यांनी सांगितले की, मुंबई बदलते आहे. सुंदर होते आहे. रस्ते होत आहेत. मेट्रोचे काम सुरू आहे. जे काम होत नव्हते, ते होत आहे. संपन्नता येत आहे. मुंबईकरांना अपेक्षित असलेले काम होत आहे. तर देशात 50-60 वर्षांत झाले नव्हते ते काम मोदींच्या नेतृत्वात होत आहे. गोविंदा यांनी पक्षात येताना कुठल्याही अटी घातलेल्या नाहीत. फिल्म इंडस्ट्रीसाठी त्यांना काही करायचे आहे. त्यांनी उमेदवारी मागितलेली नाही. ते आमचे स्टार प्रचारक म्हणून काम करतील. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी गोविंदाबाबत एक वक्तव्य केले होते की, चांगला कलाकार तरी घ्यायचा. त्याबाबत विचारले असता एकनाथ शिंदे म्हणाले की, जयंत पाटील यांच्यापेक्षा चांगले कलावंत आहेत. गोविंदासारख्या एखाद्या कलाकाराचा अपमान करणे म्हणजे संपूर्ण सिनेसृष्टीचा अपमान करणे आहे. याचे उत्तर त्यांना मिळेल. गोविंदा यांनी राजकारणात पुन्हा येण्यासाठी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे. मात्र गोविंदा केवळ पक्षाचा स्टार प्रचारक राहणार की लोकसभा निवडणूक लढवणार हे लवकरच कळेल.

राजकारणात पाहुणा कलाकार
2004 साली अभिनेता गोविंदा विरुद्ध भाजपाचे राम नाईक यांची मुंबई उत्तर मतदारसंघात लढत झाली होती. या निवडणुकीत गोविंदाने 48,271 मतांनी राम नाईक यांचा पराभव केला. राम नाईक यांच्या ‘चरैवेती चरैवेती’ या आत्मकथनात त्यांनी आरोप केला आहे की दाऊदची मदत घेऊन गोविंदाने निवडणूक जिंकली. या विजयानंतर काही काळाने मात्र गोविंदा राजकारणापासून दूर झाले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top