रणरणत्या उन्हाचा फटका महाराष्ट्रात 55 टक्के मतदान

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. या टप्प्यात महाराष्ट्रातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या 5 मतदारसंघात 55 टक्के मतदान झाले. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात वाढलेल्या तापमानाचा काहीसा फटका आजच्या मतदानाला बसला. गडचिरोलीत मतदारसंघात सर्वाधिक 64.95 टक्के मतदान झाले. मात्र, ते गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या काही नेत्यांचे राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील राज्यातील 5 मतदारसंघांत सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झाले. काही ठिकाणी उन्हाचा फटका बसू नये यासाठी सकाळीच मतदारांनी मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्या. नक्षलग्रस्त आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात मतदारांचा उत्साह दिसून आला. गडचिरोली शहरात नव मतदार, दिव्यांग, वृध्द यांना रथामध्ये बसवून वाजतगाजत मिरवणूक काढून मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यात आले. दुपारच्या वेळी संथ झालेल्या मतदानाने संध्याकाळी पुन्हा वेग घेतल्याने टक्केवारी काहीशी वाढली.
आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री धर्मराव बाबा आत्राम, रामटेकमधील महाविकास आघाडीचे उमेदवार श्यामकुमार बर्वे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री अनिल देशमुख, गडचिरोली महायुतीचे उमेदवार अशोक नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मतदानाचा हक्क बजावला.
चंद्रपुरातील हिंदी सिटी हायस्कूल या मतदार केंद्रावर महाविकास आघाडीच्या उमेदवार धानोरकर यांच्या नावापुढे फुली छापलेली असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर गदारोळ उडाला. त्यामुळे काही वेळ मतदान थांबवण्यात आले. तर चंद्रपूर जिल्ह्यातीलच जिवती तालुक्यातील अतिशय संवेदनशील असलेल्या परमडोली येथील 271 क्रमांकाच्या बूथ क्रमांकावर मतदान यंत्र बंद पडले. यामुळे कर्मचार्‍यांची तारांबळ उडाली. हा बिघाड दुरुस्त केल्यानंतर 15 मिनिटांनी मतदान पुन्हा सुरू झाले. नागपूर लोकसभा मतदारसंघात काही केंद्राजवळील राजकीय पक्षाच्या बुथवर भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी आणि कमळाचे चिन्ह असलेल्या मतचिठ्ठ्या मतदारांना देत होते. नारा येथेही मतचिठ्ठ्या देण्यावरून भाजप व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी बुथवरील यंत्र फोडले. त्यावरून तणाव निर्माण झाला. भंडार्‍यात काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम बंद पडल्याने काही काळ मतदान थांबवण्यात आले. त्यानंतर नवीन मशीन आल्यानंतर मतदान पुन्हा सुरू करण्यात आले. केडीके महाविद्यालयातील लोकसभा निवडणुकीच्या मतदान कक्ष क्रमांक पाचच्या बाहेर साप आल्याने गोंधळ उडाला होता. मतदानासाठी आलेल्या एका मतदाराने याची माहिती वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटीचे नितीश भांदककर यांना दिली. त्यानंतर अडीच फूट लांबीच्या विषारी सापाला पकडून जंगलात सोडण्यात आले.

महाराष्ट्रातील टक्केवारी
गडचिरोली-चिमूर – 64 टक्के
नागपूर – 47 टक्के
चंद्रपूर – 55 टक्के
भंडारा-गोंदिया- 50 टक्के
रामटेक – 52 टक्के

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top