राहुल गांधींची ‘भारत न्याय यात्रा’ मणिपूर ते मुंबई दोन महिने प्रवास

नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी कन्याकुमारी ते काश्मीर ‘भारत जोडो यात्रा’ काढल्यानंतर या यात्रेचा दुसरा टप्पा म्हणून काँग्रेसची पूर्व ते पश्‍चिम अशी मणिपूर ते मुंबई ‘भारत न्याय यात्रा’ 14 जानेवारी ते 20 मार्च या काळात होणार आहे. ही यात्रा 6,200 किलोमीटरची असणार असून ती 14 राज्यांतील 85 जिल्ह्यांतून जाणार आहे. मात्र राममंदिराच्या उद्घाटनानंतर फेब्रुवारी महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने ही यात्रा पूर्ण होईल का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
काँग्रेसने आज पत्रकार परिषदेत या यात्रेची माहिती देताना सांगितले की, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून 14 जानेवारी 2024 रोजी मकरसंक्रांतीपासून या यात्रेला सुरुवात होणार आहे. ती पुढील 67 दिवस चालणार आहे. मणिपूर ते मुंबई अशा भारताच्या पूर्व-पश्चिम टोकांना जोडणार्‍या या 6,200 किमी अंतराच्या यात्रेत राहुल गांधींसोबत विविध क्षेत्रातील लोक सहभागी होतील. ही यात्रा 14 राज्यांमधून 85 जिल्ह्यांतून मार्गक्रमण करणार आहे. त्यामध्ये मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे. या यात्रेचा समारोप मुंबईत होणार आहे. ही यात्रा आधीच्या भारत जोडो यात्रेपेक्षाही मोठी आहे. भारत जोडो यात्रा 4,500 किलोमीटरची होती.
काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल म्हणाले की, देशातून भाजपचा पाडाव करण्यासाठी वातावरण तयार करणे, हा या यात्रेचा उद्देश आहे. जास्तीत जास्त लोकांना या यात्रेत सहभागी होता यावे, यासाठी ही यात्रा पायी आणि बसने चालणार आहे. छोट्या छोट्या अंतरासाठी पदयात्रा काढली जाणार आहे, तर लांबचे अंतर बसने पार केले जाईल. भारत जोडो यात्रेतून अनुभव घेत राहुल गांधी या यात्रेतही तरुण, महिला आणि उपेक्षित लोकांशी संवाद साधणार आहेत. भारत जोडो यात्रेचा मुख्य उद्देश द्वेष, भीती आणि कट्टरतेच्या राजकारणाशी लढा देणे हा होता. याशिवाय केंद्र सरकारकडून लोकांच्या आशा-आकांक्षांकडे होणारे दुर्लक्ष आणि राजकीय केंद्रीकरण आणि अन्यायाविरुद्ध लढायचे होते. दुसर्‍या यात्रेचे नाव न्याय यात्रा का ठेवले, याचे उत्तर देताना काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, आम्ही जनतेला आर्थिक, सामाजिक आणि धोरणात्मक न्याय देऊ, असे आश्वासन देऊ इच्छितो.
काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 7 सप्टेंबर 2022 रोजी भारत जोडो यात्रा सुरू केली होती.ती जवळपास 5 महिने चालली. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून विविध राज्यातील काँग्रेस नेते राहुल गांधींसोबत कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत फिरले.भारत जोडो यात्रेचा काँग्रेसला फारसा फायदा झाला नाही. या यात्रेनंतर लगेचच झालेल्या कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत केवळ काँग्रेसने भाजपाला पराभूत केले. मात्र नंतर या यात्रेचा कोणताच प्रभाव दिसला नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top