रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक

मुंबई

उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, विविध अभियांत्रिकी आणि सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून काही लोकल विलंबाने धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेचे वेळापत्रक पाहून प्रवाशाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण अप आणि धीम्या मार्गावर उद्या सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत ठाणे – कल्याण दरम्यानची अप आणि धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. या लोकल डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे या स्थानकांत थांबतील. हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर उद्या सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत बेलापूर, पनवेल आणि वाशी येथून सीएसएमटी मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून वाशी/ पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे. प्रवाशांच्या सोईसाठी ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला, पनवेल आणि वाशी दरम्यान विशेष लोकल सेवा चालवल्या जातील. पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरिवली ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. या कालावधीत बोरिवली –गोरेगाव दरम्यान सर्व अप आणि डाऊन जलद लोकल धीम्या मार्गावर धावतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top