रेल्वेच्या सामान्य डब्यातील प्रवाशांसाठी २० रुपयात जेवण

मुंबई

मेल-एक्स्प्रेसच्या सामान्य कोचने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेने जन आहार भोजनाची व्यवस्था केली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेने महत्त्वाच्या स्थानकांवर आणि प्रमुख टर्मिनसवर ‘जन आहार भोजनाचे’ काऊंटर सुरू केले आहेत. येथे प्रवाशांना २० आणि ५० रुपयांचे जेवणाचे पॅकेट दिले जात आहेत. यामुळे खासगी विक्रेत्यांकडून भरमसाट किमतीत देण्यात येणारे निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ आता रेल्वेतून हद्दपार होणार आहेत.

उन्हाळी सुट्ट्या सुरु झाल्याने लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसना मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होत आहे. त्यातही किफायतशीर प्रवास म्हणून या एक्स्प्रेसच्या सामान्य डब्यातून प्रवास करण्याला प्रवाशी जास्त पसंती देतात. या प्रवाशांना कमी दरात चांगले जेवण मिळावे यासाठी रेल्वेने भारतीय रेल्वे कॅटरिंग ॲण्ड टुरिझम कॉर्पोरेशनसोबत (आयआरसीटीसी) भागीदारीत जन आहार योजना सुरू केली आहे. हा जन आहार दोन प्रकारांमध्ये देण्यात येत आहे. इकॉनॉमी जेवण २० रुपये, तर फराळाच्या जेवणाकरिता ५० रुपये दर आकारला जात आहे. फलाटावर जेथे सामान्य उबा थांबतो, त्याठिकाणी हे काऊंटर आहेत. गेल्यावर्षी ही सेवा ५१ स्थानकांवर देण्यात आली होती. यंदा देशातील १०० पेक्षा अधिक स्थानकांवर १५० काऊंटर उघडले आहेत. २० रुपयांत ७ पुरी, बटाट्याची सुकी भाजी आणि लोणचे, तर ५० रुपयांत राजमा-छोले, भात/खिचडी/कुलचे, भटुरे छोले/पाव भाजी/मसाला डोसा ३ रुपयांत १ ग्लास पाणी असा आहार दिला जातो. ही सेवा मध्य रेल्वेच्या इगतपुरी, कर्जत, मनमाड, खांडवा, बडनेरा, शेगाव, पुणे, मिरज, दौड, साईनगर शिर्डी, नागपूर, वर्धा, सोलापूर, वाडी आणि कुर्दुवाडी तर, पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस, भरूच, वडोदरा आणि चित्तौडगड स्थानकांवर पुरवली जाते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top