लोअर परळचा डिलाईल रोड पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला

मुंबई -शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून उद्घाटन केल्याच्या वादामुळे चर्चेत असलेला लोअर परळ येथील डिलाईल रोड पूल अखेर उद्या गुरुवार २३ नोव्हेंबरपासून वाहतुकीसाठी
खुला केला जाणार आहे, अशी माहिती पालिकेच्या पूल विभागाने दिली आहे.हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याआधी २५ टन वजनाचे लोड ट्रक पुलावर उभे केल्यानंतर पूल विभागाने तपासणी केली आणि मगच हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यास परवानगी दिली.

डिलाईल रोड पूल धोकादायक बनला असल्याचा अहवाल आयआयटीने दिल्यानंतर २०१८ मध्ये तो वाहतुकीसाठी बंद करून पाडला होता.त्यानंतर बांधकाम सुरू होऊन हा पूल २०२२ पर्यंत वाहतुकीसाठी खुला होणे अपेक्षित होते. मात्र,२०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे या पुलाचे काम थांबले.या पुलाचे काम रखडल्याने दक्षिण मुंबईतून पूर्व व पश्चिम उपनगरात जाणारी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. पूल सुरु करावा,अशी मागणी स्थानिकांसह विरोधकांनी लावून धरली. मात्र अनेक कारणांमुळे पुलाचे काम रखडले होते.अखेर पाच वर्षांनंतर १ जून रोजी पुलाची एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. उर्वरित बाजू दिवाळीपर्यंत खुली केली जाईल,असे पालिका प्रशासनाने सांगितले होते.

मात्र,दिवाळी संपली तरी पूल वाहतुकीसाठी खुला झाला नसल्याने आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या पुलाचे उद्घाटन करण्यात आले.पण त्यासाठी पालिकेची परवानगी घेतली नसल्याचे कारण पुढे करत ठाकरे गटातील आदित्य ठाकरेंसह अन्य नेत्यांविरोधात पालिका प्रशासनाने पोलिसांत तक्रार दाखल केली.त्यानंतर आता पूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ४८ तास तपासणी केल्यानंतर पूल वाहतुकीसाठी खुला करण्यास मान्यता मिळाली आहे.आता पुन्हा या पुलाचे उद्घाटन कुणाच्या हस्ते होणार याची चर्चा आणि धावपळ पालिका प्रशासनात सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top