लोकसभा जिंकायची तर अजित पवार पाहिजेतच ग्रामपंचायत निवडणूक निकालांचा स्पष्ट संदेश

मुंबई – आज 2359 ग्रामपंचायत आणि सरपंचपदाच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निकालावरून स्पष्ट झाले की, महाराष्ट्राच्या जनतेचा कौल हा भाजप, अजित पवार गट आणि शेवटी शिंदे गटाला आहे. काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची ताकद तळाला पोहोचली आहे. या निवडणुकीने आणखी एक बाब स्पष्ट केली की, लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा जिंकायची तर भाजपला अजित पवारांची गरज आहे. फक्त शिंदे गटाबरोबर जाऊन भाजप अडचणीत येणार आहे. भाजपला अजित पवारांना सोबत ठेवावेच लागेल. यामुळे येत्या काळात अजित पवारांच्या जास्तीत जास्त मागण्या पूर्ण करणे अपरिहार्य ठरणार आहे.
शरद पवारांपासून वेगळे झाल्यावर अजित पवारांनी लढलेली ही पहिली निवडणूक आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत पैशाल फार महत्त्व हे मान्य केले तरी त्याचा वापर सर्वच पक्षांनी पुरेपूर केला. तरीही अजित पवार गटाला मोठे यश मिळाले आहे.
स्वत: अजित पवार हे डेंग्यूने आजारी असल्याने अखेरच्या प्रचाराच्या दिवसात प्रचार करू शकले नाहीत. असे असूनही जनतेने त्यांच्या बाजूनी कौल देऊन त्यांना दुसर्‍या स्थानी आणले आणि शरद पवारांना शेवटून दुसर्‍या स्थानी फेकले. ग्रामपंचायतीच्या यशानंतर आपल्या ताकदीचा दबाव आणून अजित पवार पुन्हा मुख्यमंत्रिपदाची मागणी करतात का? अजित पवार आपल्या गटासाठी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अधिक जागा पदरात पाडून घेतात का? अजित पवार स्वत:च्या आमदारांना जादा निधी देणे सुरुच ठेवतात का? याकडे लक्ष ठेवताना शिंदे गटाला आता महायुतीत आणखी दुय्यम स्थान आल्याने भाजप त्यांच्याशी कसे वागते हे पाहणे महत्त्वाचे
ठरणार आहे.
मावळ तालुक्यात
दादा आणि भाजप

मावळ तालुक्यातील ग्रामपंचायतींवर अजित पवार गट आणि भाजपचा वरचष्मा राहिला. 19 ग्रामपंचायतींपैकी 4 ग्रामपंचायतीत बिनविरोध निवड झाली. उर्वरित 15 ग्रामपंचायतींपैकी सहा अजित पवार गटाने आणि 7 भाजपने जिंकल्या.
गुलाबराव पाटील खूश
जळगाव ग्रामीणवर सत्ता

शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्या गटाने जळगाव ग्रामीणच्या सर्वच्या सर्व ग्रामपंचायतींवर विजय मिळविला. या विजयानंतर ते म्हणाले की, विरोधकांनी शुद्धीत राहावे, जो काम करतो, त्याला जनता निवडून देत. विरोधकांच्या अतिआत्मविश्‍वासाला उत्तर मिळाले आहे.
रोहित पवारांची जादू चालली नाही
कर्जन जामखेड या आपल्या मतदारसंघातही रोहित पवारांची जादू चालली नाही. या मतदारसंघात कुंभेफळ आणि खेडगाव ग्रामपंचायतीवर भाजपने झेंडा फडकविला. रोहित पवारांना केवळ एका जागेवर यश मिळाले.
वैभव नाईकांना फटका
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांना फटका बसला. गेले अनेक वर्षे त्यांचे वर्चस्व असलेल्या आचरा ग्रामपंचायतीवर यंदा भाजपचा झेंडा फडकला. कुडाळ येथील वालावल आणि नितेश राणेंच्या कणकवलीतील ओटव ग्रामपंचायतीतही भाजपची सरशी झाली.
एकनाथ खडसे आजारी
तरी ग्रामपंचायतीत विजय

शरद पवार गटात सामील झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे आजारी असून, मुंबईत उपचार घेत आहेत. मात्र तरीही जळगावातील त्यांच्या बोदवडमधील पाचही ग्रामपंचायतीत त्यांच्या पॅनलने विजय खेचून आणला. मात्र मुक्ताई नगरच्या चार ग्रामपंचायतींपैकी खडसे गटाला एकच ग्रामपंचायत राखता आली. तीन ग्रामपंचायतींवर शिंदे गटाने
विजय मिळवला.
काय डोंगर, काय झाडी
शहाजीबापूंना धक्का

सांगोल्यातील तीन ग्रामपंचायतीत शेकापची सत्ता उलथवून शिंदे गटाचे शहाजीबापू पाटील यांनी सत्ता खेचली होती. ‘काय डोंगर, काय झाडी’ या संवादाने प्रसिद्ध झालेले शहाजीबापू यांना यंदा मात्र जोरदार धक्का देत वाडेगाव, सावेगाव व खवासपूर ग्रामपंचायतीवर शेकापने पुन्हा झेंडा फडकवला.
अनिल देशमुख काटोलमध्येच पराभूत
शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख हे नुकतेच कारागृहातून बाहेर आले आहेत. त्यांना हा दिलासा मिळालेला असतानाच त्यांच्या नागपूरच्या काटोल येथील सहाही ग्रामपंचायतीत भाजपने त्यांचा पराभव केला. खरसोलीतही त्यांचे उमेदवार पराभूत झाले.
बच्चू कडूंनी खाते उघडले
अकोल्याच्या पिंपळखेड ग्रामपंचायतीत बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या उमेदवारांचे पॅनल विजय झाल्याने ग्रामपंचायतीत बच्चू कडूंचे खाते उघडले.
बारामतीत शरद पवार गटाला
अजितदादांचा धोबीपछाड

मागील साडेपाच दशके राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार हे नाव महाराष्ट्रासह देशाच्या राजकीय वर्तुळाचा केंद्रबिंदू राहिले आहेत. शरद पवार यांची एक सभा म्हणजे विजयाची हमी, असा त्याचा दबदबा आहे. मात्र आज शरद पवार यांचे मतदारसंघ असलेल्या बारामतीतच वेगळी परिस्थिती पाहायला मिळाली. या निवडणुकीतून बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पकड कायम असल्याचे दिसले. बारामतीतील 32 ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादी काँग्रेस- अजित पवार गटाने 30 जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपला 2 जागांवर विजय झाला. बारामती तालुक्यातील काटेवाडी हे शरद पवार आणि कुटुंबाचे मूळगाव आहे. इथे अजित पवार गट विरूद्ध भाजप असा सामना रंगला होता. काटेवाडीचा गड अजित पवारांनी राखला. काटेवाडी ग्रामपंचायत पुन्हा अजित पवारांच्या ताब्यात आली. अजित पवार गटाचे जय भवानी माता पॅनल विजयी झाले. काटेवाडी ग्रामपंचायतीतील 16 पैकी 14 जागा अजित पवार गटाने जिंकल्या, तर एका जागेवर भाजप विजयी झाला आहे. काटेवाडीत एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला.
सातार्‍यात शरद पवारांचा गट
अजितदादांच्या गटावर भारी

बारामतीत अजित पवार गटाने एकहाती सत्ता राखली असली तरी सातार्‍यात शरद पवारांचा गट अजित पवारांच्या गटावर भारी ठरला. इथे शरद पवार गटाला 8 जागांवर विजय मिळाला आहे, तर अजित पवार गटाला 5 जागांवर समाधान मानावे लागले. यापाठोपाठ शिंदे गट आणि काँग्रेसला प्रत्येकी 3 जागा मिळाल्या. भाजपने 2 जागा मिळवल्या, तर ठाकरे गटाला मात्र सातार्‍यात खाते उघडता आले नाही.
शरद पवार, काँग्रेस रत्नागिरीत शून्यावर
रत्नागिरीच्या 14 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत शरद पवार गट आणि काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. उद्धव ठाकरे गटाला दोनच जागा जिंकता आल्या. अजित पवार गटाला सर्वाधिक 4 जागा, शिंदे गटाला 3 आणि भाजपला दोन जागांवर विजय मिळाला.
नारायणगावात ठाकरेंची बाजी
अमोल कोल्हेंना धक्का

जुन्नर तालुक्यातील खासदार अमोल कोल्हे यांच्या नारायणगावात राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला आहे. नारायणगाव ग्रामपंचायतीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सत्ता कायम राखली आहे. ठाकरे गटाचे 17 पैकी 16 उमेदवार विजयी झाले असून, सरपंच पदही या गटाला मिळाले.
दिलीप वळसे-पाटलांचा
उमेदवार शिंदे गटाकडून पराभूत

या निवडणुकीत सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना त्यांच्या मतदारसंघात अनेक ठिकाणी धक्के बसले. स्वतःच्या निरगुडसर गावात दिलीप वळसे-पाटील यांनी प्रचार करूनही त्यांचा संतोष टावरे हा सरपंच पदाचा उमेदवार पराभूत झाला आहे, तर रवींद्र वळसे-पाटील हा शिंदे गटाचा उमेदवार सरपंच म्हणून निवडून आला. त्याचबरोबर दिलीप वळसे-पाटील यांच्या राजकारणाचे केंद्रस्थान असलेला भीमाशंकर सहकारी साखर कारखाना ज्या पारगाव गावामध्ये आहे, त्या पारगावमध्ये वळसे यांच्या गटाचा सरपंच पदाच्या उमेदवार अर्चना ढोबळे पराभूत झाल्यात, तर शरद पवार गटाच्या श्‍वेता ढोबळे या सरपंचपदी निवडून आल्या.
बीआरएसची महाराष्ट्रात एन्ट्री
काँग्रेसला भंडार्‍यात धक्का

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्ष म्हणजे बीआरएसने भंडार्‍यात चांगले यश मिळवले आहे. या पक्षाने काँग्रेसला धक्का दिला आहे. विदर्भातील ग्रामपंचायत निवडणुकीत बीआरएस पक्षाने 9 जागांवर विजय मिळवला आहे, तर पंढरपूरमध्ये त्यांचा एक उमेदवार निवडून आला आहे. के. सी. राव यांनी काही महिन्यांपूर्वी मराठवाडा आणि विदर्भात सभा घेतल्या. त्यांच्या या सभांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. या सभेनंतर झालेली ही पहिलीच निवडणूक होती.
परळीत पंकजा मुंडेंना धक्का!
धनंजय मुंडे वरचढ ठरले

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या तीनपैकी दोन ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी आमदार धनंजय मुंडे यांच्यावर विजय मिळवला. पंकजा मुंडे यांना केवळ एका ग्रामपंचायतीवर विजय मिळवता आला. यापूर्वी वैजनाथ तालुक्यातील हिवरा, सोनहिवरा आणि वाणटाकळी तांडा या ग्रामपंचायतीवर पंकजा मुंडे यांचे
वर्चस्व होते.
ठाकरे गट सर्वात शेवटच्या स्थानावर
कोकणात ठाकरे गटाची पिछेहाट झाली. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना आचरा, कुडाळमध्ये नितेश राणे यांनी धक्का दिला. मंत्री दीपक केसरकर यांनाही आपल्या जिल्ह्यात खाते उघडता आले नाही, तर महाडमध्येही ठाकरे गटाला मोठा फटका बसला. महाडमध्ये ठाकरे गटाला 7 ग्रामपंचायतींवर समाधान मानावे लागले. आमदार भरत गोगावले यांनी ठाकरे गटाला हा धक्का दिला, तर पालघरमध्ये ठाकरे गटाला दिलासा मिळाला. पालघर जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाने 53 ग्रामपंचायतींपैकी 13 ग्रामपंचायतीत
विजय मिळवला.
इगतपुरी तालुक्यात
मनसेने खाते उघडले

इगतपुरी तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाने खाते उघडले. मोगरे ग्रामपंचायतीवर सरपंचपदी मनसेचे प्रताप विठ्ठल जाखेरे विजयी झाले, तर सांगलीच्या शिराळातील सावंतवाडी ग्रामपंचायतीवर सलग चौथ्यांदा मनसेची सत्ता कायम राहिली आहे. या ठिकाणी सरपंचासह सर्व 8 जागांवर मनसेचे उमेदवार विजयी झाले.
तानाजी सावंत यांचा हा मतदारसंघ आहे, तर अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यातील एरंडगांव भागवत या ठिकाणी मनसेचे 6 उमेदवार विजयी झालेत, तर सरपंचपदी मनसेचे गोकुळ भागवत यांची निवड झाली आहे. याशिवाय पालघर तालुक्यात मनसेचा 1 उमेदवार विजयी झाला आहे.
देगलुर ग्रामपंचायत मतमोजणी
दोन गटांत तुफान राडा

मतमोजणी सुरू असतानाच नांदेडमधील देगलुर मतदान केंद्रावर दोन गटांत बाचाबाची झाली. दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर दगडफेक केली. या दगडफेकीत काहीजण जखमी झाले. या सर्व प्रकारामुळे मतदान केंद्रावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर पोलिसांनी तातडीने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेनंतर गावात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. मरखेल पोलीस ठाण्यात दोन्ही गटांतील आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या उपस्थितीत मतमोजणी सुरळीत पार पडली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला.
पाटणमध्ये शंभूराज देसाई गटाचे वर्चस्व
पाटण तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या निकालात आठ ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले. मल्हारपेठ, मुंद्रुळकोळे, कुसरुंड, बेलवडे खुर्द, गावडेवाडी, जिंती ग्रामपंचायतींमध्ये मंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाने सत्तांतर घडवले, तर रुवले ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी आणि गाढखोपमध्ये महाविकास आघाडीने मंत्री देसाईंच्या गटाच्या पॅनेलचा पराभव केला. आठ ग्रामपंचायतींमध्ये मंत्री देसाई यांनी, तर दोन ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसने आणि मुंद्रुळकोळे खुर्द ग्रामपंचायतीत काँग्रेसने सत्ता अबाधित राखली.
मुरुड तालुक्यात इंडिया आघाडीला यश
मुरुड तालुक्यातील 15 ग्रामपंचायत निवडणुकीत 7 ग्रामपंचायतींवर इंडिया आघाडीला घवघवीत यश प्राप्त झाले आहे, तर आगरदांडा ग्रामपंचायतवर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे थेट सरपंच व सदस्य निवडून आले आहेत.
आगरदांडा ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादीचे आशिष नरेंद्र हेदुलकर यांनी शिंदे गटाचे मुरुड तालुका प्रमुख व आमदार महेंद्र दळवी यांचे खंदे समर्थक ऋषिकांत डोंगरीकर यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. इंडिया आधाडीला शीघ्रे, विहूर, नांदगाव, मांडला, भोईघर, चोरडे व राजपुरी या सात ग्रामपंचायतीवर यश मिळाले आहे.
तर बोर्ली ग्रामपंचायत निवडणुकीत इंडिया आघाडीचे थेट सरपंचपदाचे उमेदवार अस्मिता वामन चुनेकर यांना 5 मतांनी पराभव पत्करावा लागला आहे.

भाजपचा सुपडा साफ काँग्रेसलाच
सर्वाधिक जागा – नाना पटोले यांचा दावा

महाराष्ट्रातील ग्रामपंचायती निकाल महायुतीच्या बाजूने लागत असल्याचे स्पष्ट होऊनही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल असा दावा केला की, या निवडणुकीत राज्यात सर्वाधिक जागा काँग्रेसच्याच आल्या आहेत. भाजप हा खोटारडा पक्ष असून त्यांनी सांगितलेला आकडा वस्तुस्थितीला धरून नाही. सगळ्या जिल्ह्यात काँग्रेसच आघाडीवर आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातही भाजपचा पराभव झाला आहे. भाजपने विजयी ग्रामपंचायतींची यादी जाहीर करावी. तेव्हाच कळेल कुठल्या ग्रामपंचायती कुणी जिंकल्या. खोटे बोलतील तर लोक त्यांना मारतील.त्यांचे मूळ असलेल्या ठिकाणीच त्यांचा सुपडा साफ झालेला आहे.
भाजपने ओबीसी आरक्षण न देताच या निवडणुका घेतल्या आहेत. हिंमत असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लावाव्यात. ओबींसीवर अन्याय करणार्‍या भाजपला लोकांनी त्याची जागा दाखवून दिली आहे, अशी टीकाही नाना पटोले यांनी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top