वय वाढल्याने नारायण राणे निवडणूक लढविणार नाहीत

  • निलेश राणे यांचा खुलासा

रत्नागिरी – काही दिवसांपासून कोकणात केंद्रीय मंत्री नारायण राणे हे लोकसभा निवडणुक लढविणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र नारायण राणे हे लोकसभा निवडणूक लढविणार नाहीत, असा स्पष्ट खुलासा राणे याचे पुत्र माजी खासदार नीलेश राणे यांनीच केला आहे. वयोमानानुसार ते निवडणूक लढविणार नसल्याचेह निलेश राणे यांनी यांनी सांगितले.

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत नीलेश राणे हे बोलत होते. नीलेश राणे पुढे म्हणाले की,एकूण मतांचा विचार करता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपाचाच दावा आहे. पण मी काही या निवडणुकीसाठी इच्छुक नाही आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हेदेखील वयोमानानुसार ही निवडणूक लढविणार नाहीत.भाजपाचा कमळ निशाणीवरील अधिकृत उमेदवार लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्यांनी विजयी होणार आहे. महायुती म्हणून कधी दोन पावले मागे, दोन पावले पुढे जाण्यात सर्वांचे भले आहे. भाजपाच्या अधिकृत उमेदवाराला विजयी करण्यासाठी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते निश्चितच प्रयत्न करतील,असा आशावाद राणे यांनी व्यक्त केला.

निलेश राणे पुढे म्हणाले की, केंद्र शासनाच्या मध्यम लघु,सूक्ष्म उद्योग विभागामार्फत फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रत्नागिरीत ३ दिवसीय प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. त्यासाठी केंद्रातील ८० अधिकारी रत्नागिरीत माहिती देण्यासाठी येतील. यातून उद्योग व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे. याआधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन दिवसीय प्रदर्शन भरवले होते.अशाच प्रकारचे प्रदर्शन रत्नागिरी जिल्ह्यातही भरवावे, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केली होती. त्यांच्या मागणीनुसार १ ते १० फेब्रुवारीदरम्यान रत्नागिरीत प्रदर्शन भरवले जाणार आहे. प्रदर्शनात विविध प्रकारचे स्टॉल उभारले जाणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top