विरार – अलिबाग केवळ २ तासांत !कॉरिडॉर काम नववर्षात सुरू होणार

मुंबई- सध्या विरारहून अलिबागला जाण्यासाठी चार ते पाच तास लागतात. पण आता हा प्रवास अवघ्या दीड-दोन तासांत पूर्ण करता येणार आहे.कारण कॉरिडॉरच्या बांधकामाला अखेर २०२४ मध्ये सुरुवात होणार आहे.हा महत्त्वाचा प्रकल्प सुरू करण्यासाठी भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, डिसेंबर अखेरपर्यंत ८० टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

पुढीलवर्षी मार्च- एप्रिलपर्यंत प्रोजेक्टसाठी लागणारी संपूर्ण जमीन पालिकेकडे असणार आहे.पालघर, ठाणे आणि रायगडमध्ये सुमारे १२८ किलोमीटर लांबीच्या कॉरिडॉरसाठी भूसंपादनाचे काम वेगाने सुरू आहे. पालघरमध्ये सुमारे ९३ टक्के जमीन संपादित करण्यात आली आहे.ठाणे आणि रायगडमध्ये भूसंपादनाचे काम सुरू असून कॉरिडॉरचे बांधकाम पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत सुरू होणार आहे.

कॉरिडॉरचे बांधकाम दोन टप्प्यात केले जाणार आहे. एका टप्प्यात ९७ किमी आणि दुसऱ्या टप्प्यात २९ किमीचा मार्ग तयार करण्यात येणार आहे. नागरिकांना एका भागातून दुसऱ्या भागापर्यंत सहज पोहोचता यावे, यासाठी सरकारने सुमारे ११ वर्षांपूर्वी १२६ किलोमीटर लांबीच्या कॉरिडॉरचा प्रस्ताव तयार केला होता,परंतु विविध कारणांमुळे प्रकल्पाचे बांधकाम सुरू होऊ शकले नाही.आता सरकारने कॉरिडॉरचे काम लवकरच सुरू करण्याची तयारी जोरात सुरू केली आहे. विरार- अलिबाग प्रोजेक्ट तयार करून रिंग रूट तयार करण्याच्या योजनेवर सरकार काम करत आहे. त्यासाठी एमएमआरडीएचे सध्या सुरू असलेले सर्व प्रोजेक्ट एकमेकांशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.याअंतर्गत विरार अलिबाग कॉरिडॉर, शिवडी- न्हावासेवा ट्रान्स हार्बर लिंक प्रोजेक्ट,शिवडी-वरळी कनेक्टर, वसई- भाईंदर ब्रिज, कोस्टल रोड,वर्सोवा- वांद्रे सी लिंक आणि वांद्रे-वरळी सी लिंकसह अन्य प्रोजेक्ट जोडले जाणार आहेत. यातील शिवडी- न्हावासेवा ट्रान्स हार्बर लिंक प्रोजेक्टवर येत्या दोन ते तीन महिन्यांत वाहनांची ये -जा सुरू होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top