विश्‍वचषकातील विजयाष्टमी रोहित शर्माचा पुन्हा तडाखा!

अहमदाबाद – अहमदाबादच्या नरेंद्र मोेदी स्टेडियमवर आज भारताने पाकिस्तानविरुद्ध विश्‍वचषकातील सलग आठवा विजय साकारला. विश्‍वचषकाच्या अंतिम सामन्यापेक्षाही अधिक उत्कंठा निर्माण करणार्‍या या महालढतीत शनिवारी रोहित शर्माच्या तडाख्याचा भाग-2 पाहायला मिळाला. 63 चेंडूंत सहा चौकार आणि सहा उत्तुंग षटकारांनिशी साकारलेली 86 धावांची रोहितची खेळी पाकिस्तानच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवणारी होती. त्यामुळेच भारताने पाकिस्तानवर सात गडी राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानला हरवणार्‍या भारताने विश्‍वचषकातील आपला तिसरा विजय नोंदवला आणि गुणतालिकेत अग्रस्थानावर मुसंडी मारली.
2019 च्या विश्‍वचषकात पाकविरुद्ध 140 धावांची सामनावीर खेळी उभारणार्‍या रोहितने अफगाणिस्तानविरुद्धच्या याआधीच्या सामन्यात 131 धावा केल्या होत्या. नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर घोंगावणारे ‘विक्रम’ वादळ अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरही क्रिकेट चाहत्यांना अनुभवता आले. त्याने पहिल्या चेंडूवर चौकार खेचत आपल्या आक्रमक पवित्र्याचा इशारा दिला. त्याने पाकिस्तानच्या दर्जेदार गोलंदाजांच्या मार्‍याच्या ठिकर्‍या उडवल्या. रोहितचे सहाही षटकार डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. विश्‍वचषकातील सर्वाधिक सातव्या शतकाकडे कूच करीत असताना शाहीन आफ्रिदीने त्याला बाद केले, पण तोवर भारताचा विजय निश्चित झाला होता. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला फक्त 191 धावांवर रोखल्यानंतर हे तुटपुंजे लक्ष्य फलंदाजांनी 30.3 षटकांत आरामात पार करून हा विजय नोंदवला.
डेंग्यूतून सावरत मैदानावर उतरलेल्या शुभमन गिलचा (16) अडसर आफ्रिदीने दूर केला. मग रोहितने विराट कोहलीच्या (16) साथीने 56 धावांची भागीदारी केली, पण कोहलीला मोठ्या धावसंख्येपासून आणि सलग तिसर्‍या अर्धशतकापासून हसन अलीने रोखले. मग रोहितने श्रेयस अय्यरच्या साथीने तिसर्‍या गड्यासाठी 77 धावांची भागीदारी रचली. रोहित बाद झाल्यावर श्रेयसने के. एल. राहुलसमवेत चौथ्या गड्यासाठी नाबाद 36 धावांची भागीदारी केली. श्रेयसने चौकार मारून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. नाबाद 53 धावांचे उपयुक्त योगदान दिले.
तत्पूर्वी, गोलंदाजांच्या वर्चस्वपूर्ण कामगिरीमुळे भारताने 2 बाद 155 अशी दमदार सुरुवात करणार्‍या पाकिस्तानचा डाव फक्त 42.5 षटकांत 191 धावांत रोखले. फक्त 36 धावांत पाकिस्तानने आठ फलंदाज गमावले. जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव आणि रवींद्र जाडेजा या भारताच्या पाचही गोलंदाजांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. गोलंदाजांमध्ये उत्तम बदल करण्याची रोहितची चाल यशस्वी ठरली.
नाणेफेक जिंकून कर्णधार रोहितने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, तेव्हा ते अपेक्षितच मानले जात होते. अब्दुल्ला शफिक (20) आणि इमाम-उल-हक (36) जोडीने 41 धावांची सलामी दिली. शफीकला सिराजने पायचीत केले, तर इमामला पंड्याने तंबूत पाठवले. यष्टीरक्षक के. एल राहुलने सूर मारून अप्रतिम झेल टिपला. त्यानंतर सूर हरवलेला कर्णधार बाबर आझम (50) आणि लयीत असलेल्या मोहम्मद रिझवान (49) यांनी तिसर्‍या गड्यासाठी 82 धावांची भागीदारी करून पाकिस्तानला मोठ्या धावसंख्येची आशा दाखवली. इथवर तरी पाकिस्तान किमान 250हून अधिक धावसंख्या उभारणार अशी चिन्हे दिसत होती. पाकिस्तानच्या धावांवर अंकुश ठेवण्याचे कार्य मात्र भारताने उत्तमपणे केले होते.
30व्या षटकात रोहितने सिराजकडे चेंडू दिला. सिराजने बाबरचा त्रिफळा उडवून ही जोडी फोडली. मग कुलदीपने 33व्या षटकात सौद शकील (6) आणि इफ्तिखार अहमद (4) यांना बाद करून पाकिस्तानला हादरे दिले. पुढच्याच षटकात बुमराने रिझवानचा त्रिफळा उडवून पाकिस्तानच्या आव्हानातील हवाच काढली. नेदरलँड्सविरुद्ध 68 धावा आणि श्रीलंकेविरुद्ध नाबाद 131 धावांची विजयी खेळी साकारणार्‍या रिझवानला सलग तिसरे अर्धशतक नोंदवण्यात अपयश आले. मग बुमराने शादाब खानचाही (2) त्रिफळा उडवला. पाकिस्तानच्या तळाच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. हार्दिकने मोहम्मद नवाझला (4) माघारी धाडले. त्यानंतर रवींद्र जाडेजाने हसन अली (12) आणि हारिस रौफला (2) बाद करून पाकिस्तानच्या डावापुढे पूर्णविराम दिला.
निळे साम्राज्य!
नरेंद्र मोदी स्टेडियमवर पूर्णत: भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीच्या रंगाचे निळे साम्राज्य दिसून आले. भारताच्या सलग तिसर्‍या सामन्याला प्रेक्षकांची उपस्थिती ही समाधानकारक आढळली. विशेषत: एक लाख, 32 हजार प्रेक्षकसंख्येच्या या स्टेडियममध्ये बहुचर्चित भारत-पाकिस्तान सामन्यासाठी प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. यात मुंबई, सुरत, बडोदा, इंदूर, पुणे, कोल्हापूर, चंदीगढ, पाटणा येथून आलेल्या क्रिकेटरसिकांचा मोठा भरणा होता. या सामन्याच्या निमित्ताने स्टेडियमच्या परिसरात छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे अहमदाबादमधील हॉटेल्सचे भाव गगनाला भिडले होते.

सुनो गौरसे दुनियावालो…?
भारत-पाकिस्तान सामन्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या संगीत कार्यक्रमात शंकर महादेवनने ‘सुनो गौरसे दुनियावालो…’ हे गाणे सादर केले. याशिवाय अर्जित सिंग, सुनिती चौहान या दिग्गज गायकांनीही आपली गाणी सादर केली. परंतु हा कार्यक्रम फक्त स्टेडियममध्ये उपस्थित राहिलेल्या प्रेक्षकांसाठीच मर्यादित होता. त्यामुळे टेलिव्हिजन प्रेक्षकांना या कार्यक्रमाचा आस्वाद घेता आला नाही. विश्‍वचषकाचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला होता. परंतु ‘बॉयकॉट इंडोपाक मॅच’ या हॅशटॅगसह सोशल मीडियावर सुरू असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर संगीत कार्यक्रम मर्यादित ठेवण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.

रोहितकडून विजयाचे श्रेय गोलंदाजांना
पाकिस्तानला 190 धावांत रोखण्याची किमया साधणार्‍या गोलंदाजांना भारताचा कर्णधार रोहित शर्माने विजयाचे श्रेय दिले. “एका टप्प्यावर पाकिस्तानचा संघ 280 ते 290 धावांपर्यंत मजल मारण्याची चिन्हे दिसत होती. परंतु सर्वच गोलंदाजांनी आपले कार्य चोख बजावले,” अशा शब्दांत रोहितने गोलंदाजांचे कौतुक केले. “विश्‍वचषकाआधीच प्रत्येकाला आपली भूमिका समजावून सांगण्यात आली होती. त्यामुळे गोलंदाज आणि फलंदाजांनी आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली. स्पर्धा प्रदीर्घ कालावधीची आहे. साखळीतले नऊ सामने आणि त्यानंतर उपांत्य आणि अंतिम सामना असा स्पर्धाकार्यक्रम आहे. त्यामुळे तीन सामन्यांतील विजयांमुळे मी हरखून गेलेलो नाही. संघाचा योग्य समतोल राखणे महत्त्वाचे आहे,” असे रोहितने सांगितले.

कोहलीची चुकीची जर्सी
क्षेत्ररक्षणासाठी उतरलेल्या कोहलीने चुकीची जर्सी परीधान केली होती. परंतु काही षटकांनंतर ही बाब त्याच्या लक्षात आली. त्यामुळे सातव्या षटकात जर्सी बदलण्यासाठी त्याने मैदान सोडले. डगआऊटमध्ये जाऊन जर्सी बदलून तो आठव्या षटकात योग्य जर्सीसह क्षेत्ररक्षणासाठी अवतरला.

संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान : 42.5 षटकांत सर्व बाद 191 (बाबर आझम 50, मोहम्मद रिझवान 49; जसप्रीत बुमरा 2/19, हार्दिक पंड्या 2/34) पराभूत वि. भारत : 30.3 षटकांत 3 बाद 192 (रोहित शर्मा 86, श्रेयस अय्यर नाबाद 53; शाहीन आफ्रिदी 2/36)

सामनावीर : जसप्रीत बुमरा

सांख्यिकी
300 : रोहितने रौफच्या गोलंदाजीवर खेचलेला षटकार हा एकदिवसीय क्रिकेटमधील त्याचा 300वा षटकार ठरला. या प्रकारात सर्वाधिक षटकार मारणार्‍या गोलंदाजांच्या यादीत शाहिद आफ्रिदी (351), ख्रिस गेल (331) यांच्यानंतर रोहित तिसर्‍या क्रमांकावर आहे.
6 : भारताने विश्‍वचषकातील 8 सामन्यांपैकी सहाव्यांदा नाणेफेकीचा कौल जिंकला.
50 : श्रेयस अय्यर 50व्या एकदिवसीय सामन्यात खेळला.
8 : भारताने एकदिवसीय विश्‍वचषकात आठव्यांदा पाकिस्तानला हरवले.
2 : भारताने विश्‍वचषकात पाकिस्तान विरुद्ध दुसर्‍यांदा धावसंख्येचा पाठलाग करून विजय मिळवला. याआधीचा विजय 2003मध्ये मिळवला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top