शनि मंदिरातील भुयारी मार्गभाविकांसाठी खुला

अहमदनगर

शनिशिंगणापूर येथील शनि मंदिरात जाणारा भुयारी मार्ग आजपासून भाविकांसाठी खुला करण्यात आला आहे. हा भुयारी मार्ग अडीचशे मीटरचा असून, यामुळे मंदिर प्रवेशद्वारासमोरील वाहतुकीची गर्दी कमी होणार आहे. या मार्गामुळे भाविकांना सुलभतेने शनिदर्शन घेता येणार आहे. लवकरच मुख्य दर्शन मार्ग बंद करण्यात येणार आहे. या भुयारी मार्गामुळे भाविकांना वाहनतळातून थेट मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत सरळ पोहोचता येणार आहे. भाविकांनी या नव्या मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन देवस्थान प्रशासनाने केले आहे. महाद्वारासमोर छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम भेटीचे शिल्प उभारण्याचे काम सुरु असल्याने महाद्वारासमोरील सध्या सुरू असलेला मुख्य मार्ग बंद करण्यात येणार आहे.

शनिशिंगणापूर येथे पानसतीर्थ प्रकल्पाची कामे अनेक वर्षांपासून सुरू आहेत. या अंतर्गत तब्बल तेरा वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर भुयारी मार्ग भाविकांसाठी खुला करण्यात आला आहे. भव्यदिव्य दर्शन मार्गाचा हा प्रकल्प सुरू होत असताना उद्घाटनाविनाच या रांगेतून भाविक भक्तांना दर्शनासाठी पाठवले जात आहे. विविध कामे झाल्यानंतर लगेच येत्या काही दिवसांत दर्शनरांग पानसतीर्थ प्रकल्पाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती देवस्थान प्रशासनाने दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top