शरद पवारांपुढे अचानक नवे संकट उभे अपक्ष उमेदवारांना तुतारी चिन्ह दिले

बारामती – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवारांकडून निवडणूक आयोगाने घड्याळ हे चिन्ह काढून घेतले आणि शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिले. हे चिन्ह तळागाळापर्यंत पोहोचवणे अत्यंत जिकरीचे काम आहे. त्यातच आता निवडणूक आयोगाने काही अपक्ष उमेदवारांना तुतारी हे चिन्ह दिले आहे. तुतारी वाजवणारा माणूस आणि तुतारी या दोन्हीतील फरक ज्या मतदारांना कळणार नाही ते चुकून तुतारी या चिन्हाचे बटण दाबतील हे नवीन संकट शरद पवारांपुढे उभे राहिले आहे. विशेष करून बारामती आणि माढा या महत्त्वाच्या मतदारसंघात अपक्षांना हे चिन्ह देण्यात आले आहे. याबाबत शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली. मात्र आयोगाने ही तक्रार फेटाळून लावली.
बारामती लोकसभा मतदारसंघात सोयल शहा युनूस शहा शेख या अपक्ष उमेदवाराला तुतारी हे चिन्ह दिले आहे आणि माढा मतदारसंघात रामचंद्र मायप्पा घटुकडे यांना तुतारी हे चिन्ह दिले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे नेते तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह सर्वांना कळावे यासाठी प्रत्येक कार्यक्रमात तुतारीवाल्याला नेऊन तुतारी वाजवत आहेत. आता मात्र त्यांच्या मतदारांनी लक्षात न आल्याने तुतारीवाल्याला मत देण्याऐवजी तुतारी चिन्हापुढचे बटण दाबले तर शरद पवार गटाची असंख्य मते घटण्याची भीती निर्माण झाली आहे.
बारामती मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे यांना निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा मोठा फटका बसणार आहे. या मतदारसंघात सोयल शहा युनूस शहा शेख हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी चिन्हांच्या पहिल्या पसंतीक्रमामध्ये ’तुतारी’ या चिन्हाची मागणी केली होती. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडून त्यांना तुतारी हे चिन्ह देण्यात आले. याला आक्षेप घेत सुप्रिया सुळेंचे निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबीया यांनी त्याबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. हे जाणीवपूर्वक केले जात असल्याचा संशयदेखील त्यांनी व्यक्त केला आहे. याबाबत सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, केवळ बारामतीच नव्हे तर, निवडणूक आयोगाकडे एक महिन्यापासून फॉलोअप घेत आहोत. जिथे जिथे राष्ट्रवादी शरद पवार गटाने उमेदवार उभा केला तिथे तिथे अपक्ष उमेदवारांना तुतारी हे चिन्ह देण्यात आले आहे. यामुळे मतदारांचा गोंधळ उडू शकतो
बारामतीप्रमाणे माढा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार रामचंद्र मायप्पा घटुकडे यांनाही तुतारी चिन्ह देण्यात आले आहे. या मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील हे भाजपाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याविरुद्ध निवडणूक लढवत आहेत. प्रचाराच्या वेळी मोहिते-पाटील यांचे गावोगावी तुतारी वाजवून स्वागत होत आहे. त्यामुळे इथे तुतारी प्रसिध्द झाली आहे. मात्र घटुकडे यांना तुतारी मिळाल्याने तेही तुतारी वाजवून प्रचार करू शकतात. पुण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे याबाबत म्हणाले की, ही चिन्हे केंद्रीय निवडणूक आयोगाने वाटप केलेली आहेत. या चिन्हांबाबत काही आक्षेप असल्यास त्यावर जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून मला निर्णय घेता येणार नाही. केंद्रीय निवडणूक आयोगच याबाबतचा निर्णय घेईल. तर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मुख्य निवडणूक अधिकारी कविता द्विवेदी यांनी सुप्रिया सुळे यांचा आक्षेप फेटाळत परिपत्रकाद्वारे यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. त्यात म्हटले की, अपक्ष उमेदवार सोयल शहा युनूस शहा शेख यांना अराखीव/ खुल्या चिन्हांपैकी तुतारी हे चिन्ह पसंतीक्रमानुसार नेमून देण्यात आले आहे. या चिन्हाबाबत आपण चिन्ह वाटप बैठकीमध्ये आक्षेप घेतला होता. त्यावेळी मला सांगितले की, प्रस्तुत चिन्ह हे भारतीय निवडणूक आयोगाने निर्धारित करून दिल्याने त्यामध्ये कोणतेही बदल करण्याचा अधिकार नाही. दोन्ही चिन्हांच्या प्रतिकृती वेगवेगळ्या असून मराठीतील नावेही भिन्न आहेत. त्यामुळे आपल्या आक्षेपाशी असहमत असून आपला आक्षेप अमान्य करण्यात येत आहे.’
यावर बोलताना शरद पवार यांनी आज अलिबाग येथे झालेल्या सभेत भाष्य केले. ते म्हणाले की, मला त्यात काही अडचण वाटत नाही. आमचे चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे. तर बारामती, सातारा आणि माढामधील अपक्ष उमेदवारांना ट्रम्पेट हे चिन्ह देण्यात आले आहे. हे चिन्ह ज्याला मिळाले आहे, त्याचे नाव पहिल्या 12 मध्ये येणार नाही. मशीनवर पहिली बारा नावे येतात. त्यामुळे ट्रम्पेट चिन्ह बघायची वेळच येणार नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top