शरद पवार यांची शपथनाम्यात बेफाम आश्‍वासने सिलिंडर 500 रुपये! नोकरीत महिलांना 50 टक्के आरक्षण

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाचा शपथनामा जाहीर केला. मात्र हा शपथनामा म्हणजे कधीही पूर्ण न होऊ शकणारी बेफाम आश्‍वासने आहेत. शरद पवार यांच्याकडे हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेही खासदार नाहीत, केेंद्रात त्यांचा दबदबा जवळजवळ संपुष्टात आलेला आहे, इंडिया आघाडीचे सरकार येईल की नाही हे सांगता येत नाही, इंडिया आघाडीचे सरकार आले तरी शरद पवारांना त्यात विशेष महत्त्व नसेल. त्यामुळे केंद्रात सरकार आल्यावर मी आश्‍वासने पूर्ण करीन. हे शरद पवारांच्या शपथनाम्यातील वाक्यच काहीसे हास्यास्पद आहे.
शरद पवारांनी कधीही पूर्ण होऊ न शकणारी बेफाम आश्‍वासने दिली आहेत. यात गॅस सिलिंडर 500 रुपयांत देणार, शासकीय नोकर्‍यांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण देऊ, जीएसटीचा अधिकार राज्य सरकारला देणार, पेट्रोल-डिझेलवरील करांची पुनर्रचना करणार आदी आश्‍वासने आहेत. ही आश्‍वासने पूर्ण करणार हे शरद पवार कशाच्या आधारे सांगत आहेत? इंडिया आघाडीतील इतर पक्षांच्या जाहीरनाम्यात ही आश्‍वासनेही नाहीत. त्यामुळे केवळ मतदारांना भुलवण्यासाठी हा शपथनामा जाहीर केला का? असा सवाल विचारला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सकाळी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वात जाहीरनामा तयार आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्यांचा उल्लेख करत सांगितले की, शपथपत्रात समाजातल्या सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. जे मुद्दे जाहीरनाम्यात समाविष्ट आहेत, ते मुद्दे आमचे नेते संसदेत मांडतील. महागाई वाढत आहे, शेतकर्‍यांची दुरवस्था झाली आहे आणि देशात बेरोजगारी आहे. गेल्या दहा वर्षांत एजन्सींचा गैरवापर आणि खासगीकरणासारख्या समस्या वाढत आहेत. या सर्व मुद्यांवर आम्ही आमची भूमिका यापूर्वीच व्यक्त केली आहे.
जाहीरनाम्यातील आश्‍वासनांची माहिती देताना जयंत पाटील मोठीच्या मोठी जंत्री वाचून दाखवली. ते म्हणाले की, स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती कमी करून 500 रुपयांपर्यंत आणल्या जातील. गरज पडल्यास केंद्र सरकार त्यासाठी अनुदानही देईल. पूर्वी यूपीएच्या काळात असे अनुदान होते. पेट्रोल-डिझेलवरील करांची पुनर्रचना करू. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर नियंत्रणात आणता येतील. केंद्रात 30 लाखांहून अधिक शासकीय नोकर्‍या रिक्त आहेत. त्या रिक्त जागा आम्ही सरकारमध्ये सामील झाल्यास भरू आणि देशातील जनतेला चांगली सेवा देण्याचा आग्रह करू. शासकीय नोकरीत महिलांना 50 टक्के आरक्षण ठेवण्याचा आग्रह करू. देशात जीएसटी कर नागरिकांना लुबाडण्याचे काम करत आहे. जीएसटी कराबाबत केंद्र सरकारचा हस्तक्षेप कमी ठेवत, संबंधित राज्यांना जीएसटी कर ठेवण्याचे अधिकार देऊ, देशातील अप्रेंटिस कायदा मंजूर करताना एखादा विद्यार्थ्याने डिग्री आणि डिप्लोमामध्ये पदवी मिळवल्यास त्याला पहिल्या वर्षासाठी 8,500 रुपये इतका स्टायपेंड दिला जाईल. देशातील स्पर्धा परीक्षांसाठी आकारले जाणारे शुल्क माफ केले जाईल. याव्यतिरिक्त समाज शाळा आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर महिलांच्या सुरक्षेसाठी कडक कायदे करू. शाळा कॉलेजमध्ये सेफ्टी ऑडिट करू. शेतकर्‍यांसाठी आयोग निर्माण करू. सत्तेत आल्यावर जातीनिहाय जनगणना करू. आरक्षणाची 50 टक्क्यांची अट दूर करण्यासाठी विशेष कायदा करू. खासगी कॉलेजमध्ये आरक्षण ठेवण्याचे काम करू. ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोगाची स्थापना करू. आरोग्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद 4 टक्क्यांपर्यंत करू. शिक्षणासाठी अर्थसंकल्पीय तरतूद 6 टक्क्यांपर्यंत करू. शेती आणि शैक्षणिक वस्तूंवर शून्य टक्के जीएसटी लावू. खासगीकरणावर मर्यादा आणू. अग्निवीर योजना आम्ही बंद करू. वन नेशन आणि वन इलेक्शनवर चर्चा करण्याऐवजी आधी आहेत त्या इलेक्शन यंत्रणा सक्षम करू. प्रत्येक गरीब महिलेला वार्षिक 1 लाख देऊ. अंगणवाडी कर्मचार्‍यांची संख्या वाढवू.
याशिवाय राज्यपालांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीवरून करावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या शपथनाम्यामध्ये करण्यात आली आहे. या मागणीचे समर्थन शरद पवार यांच्याकडून करण्यात आले आहे. जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर प्रचार गीतदेखील रिलीज करण्यात आले आहे. या गीतामध्ये तुतारी आणि शरद पवार यांचा उल्लेख आहे. या प्रचारगीतामध्ये शरद पवार यांच्यावरच मुख्य फोकस आहे.
या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना पवार म्हणाले की, मागील दहा वर्षांत शेती संबंधीचे प्रश्न वाढले आहेत. भाजपाने या कालावधीत त्यांनी काय केले ते सांगावे. त्यांचे शेती संबंधित ज्ञान मर्यादीत, त्यावर जास्त काय बोलायचे? ‘त्यांनी दहा वर्षांत काय केले ते सांगावे. 20 वर्षे आधी काय झाले, 40 वर्र्षे आधी काय झाले हे विचारू नये.’

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top