शिंदेंची पहिली यादी जाहीर विद्यमान खासदारांनाच संधी

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आज शिंदे गटाच्या 8 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. यात 7 विद्यमान खासदारांचा समावेश आहे. केवळ रामटेक मतदारसंघात काँग्रेसमधून आलेल्या राजू पारवेना उमेदवारी देण्यात आली आहे. शिंदे गटाच्या यादीवरून बहुतेक ठिकाणी धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशी शिवसेनेच्या 2 गटांतच लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या यादीत कल्याण-डोंबिवलीचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचे नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शिंदे गटाकडून आज पत्रकार परिषद घेऊन यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले जात होते. परंतु संध्याकाळी अचानक उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. या यादीत राहुल शेवाळे – दक्षिण मध्य मुंबई, सदाशिव लोखंडे -शिर्डी, प्रतापराव जाधव – बुलडाणा, संजय मंडलिक – कोल्हापूर, हेमंत पाटील-हिंगोली, श्रीरंग बारणे-मावळ, धैर्यशील माने-हातकणंगले या 7 विद्यमान खासदारांचा समावेश आहे. केवळ रामटेक मतदारसंघातून काँग्रेसमधून आलेल्या राजू पारवेना उमेदवारी देण्यात आलेली आहे. शिंदे गटाच्या यादीवर नजर टाकल्यास त्यांची ठाकरे गटाच्या उमेदवारांशीच सरळ लढत असेल. दक्षिण मध्य मुंबईत राहुल शेवाळे विरुद्ध ठाकरेंचे अनिल देसाई, शिर्डीत सदाशिव लोखंडे विरुद्ध उबाठाचे भाऊसाहेब वाकचौरे, बुलडाण्यात प्रतापराव जाधव यांच्याविरुद्ध नरेंद्र खेडेकर, हिंगोलीत हेमंत पाटील विरुद्ध नागेश पाटील आष्टीकर, मावळमध्ये श्रीरंग बारणे विरुद्ध संजोग वाघेरे, असा सामना रंगणार आहे.
आज जाहीर झालेल्या यादीत मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार असलेल्या कल्याण-डोंबिवलीसह, ठाणे, नाशिक, संभाजीनगर व यवतमाळ-वाशिम या मतदारसंघातील उमेदवारांचा समावेश नाही.
कल्याण-डोंबिवली मतदारसंघात भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेत वाद आहे. हा वाद मिटल्याचे सांगितले जात होते. तरीही या मतदारसंघावर दावा असणार्‍या श्रीकांत शिंदेंचे नाव जाहीर न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यातून ठाकरे गटाचे विद्यमान खासदार राजन विचारेंच्या विरोधात रवींद्र फाटक यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचीही चर्चा आहे. नाशिक, वाशिम-यवतमाळ या दोन मतदारसंघांबाबतही सस्पेन्स कायम असल्याने या मतदारसंघासाठी इच्छुक असलेले हेमंत गोडसे व भावना गवळी यांचे टेन्शन वाढले आहे. बुलडाण्यात संजय गायकवाड यांनी एक अपक्ष असून आणि एक पक्षाकडून असे दोन अर्ज भरले असले तरी तिथे प्रतापराव जाधव यांना तिकीट देण्यात
आले आहे.
रामटेक लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघातून विद्यमान खासदार कृपाल तुमाने दोनदा विजयी झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत सुरुवातीला तळ्यात-मळ्यात भूमिका घेणारे कृपाल तुमाने नंतर शिंदे गटासोबत गेले. काही दिवसांपूर्वीच उमरेडचे आमदार राजू पारवे यांना शिवसेना शिंदे गटात प्रवेश देण्यात आला होता. आज शिंदे गटाने अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघासाठी राजू पारवेंना उमेदवारी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top