‘शिवाजी पार्क’वर प्रचार सभांचा धुरळा! राजकीय पक्षांचे पालिकेकडे अर्ज दाखल

मुंबई – दादरमधील शिवाजी पार्क आणि राजकिय सभा हे एक जुने नाते आहे.यंदाही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवाजी पार्क मैदानावर प्रचार सभा घेण्यासाठी सर्वच महत्त्वाच्या राजकीय पक्षांनी मुंबई महापालिकेकडे अर्ज केले आहेत. शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट,राष्ट्रवादी अजित पवार गट, भाजप तसेच राज ठाकरेंचा मनसे या पक्षांनी विविध तारखांना मैदान देण्याची विनंती केली असून त्यामुळे लोकसभा निवडणूक काळात शिवाजी पार्कात प्रचार सभांचा धुरळा उडण्याची शक्यता आहे.
शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर होणारी ही पहिली निवडणूक असल्याने शिवाजी पार्क गाजविण्यासाठी दोन्ही पक्ष आतूर आहेत.या दोन पक्षांखेरीज आणखी तीन पक्षांनी मैदानावर सभेच्या परवानगीसाठी महापालिकेच्या जी उत्तर विभागाकडे अर्ज केले आहेत.संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनीही याला दुजोरा दिला असून तारखांबाबत तपशील देण्यास मात्र नकार दिला. सर्व अर्ज मंजुरीसाठी राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येतील असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फुट पडली असल्याने अजित पवारांचा गट शिवाजी पार्कच्या सभेसाठी प्रयत्नशील आहे.
दुसरीकडे ९ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या सभेसाठी मनसेने सभेसाठी अर्ज केला असून त्यांना परवानगी मिळाल्याचे समजते. विशेष म्हणजे दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाने तर आत्ताच अर्ज केला आहे. त्याचप्रमाणे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने एकाच दिवशी म्हणजे १७ मे रोजी सभेसाठी अर्ज केला आहे. त्यामुळे आता या तारखेला कुणाला परवानगी मिळणार यावरून वाद रंगण्याची चिन्हे आहेत.शिंदे गटाने १६, १९, २१ एप्रिल आणि ३, ५ व ७ मे या तारखांना सभा घेण्यासाठी अर्ज केला आहे. अजित पवार गटाने २२, २४, २७ एप्रिल तर भाजपने २३, २६, २८ एप्रिलला मैदान मिळण्यासाठी पालिकेकडे अर्ज दाखल केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top