शेकाप नेत्या व माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचे निधन

अलिबाग :

शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचे आज निधन झाले. त्यांच्यावर आज दुपारी अलिबागच्या पेझारी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मीनाक्षी पाटील या अलिबाग विधानसभा मतदारसंघाच्या तीन वेळा आमदार होत्या.

१९९९ मध्ये तत्कालीन विलासराव देशमुख सरकारमध्ये त्या राज्यमंत्री म्हणून कार्यरत होत्या. शेकापचे आ. जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील यांच्या त्या भगिनी होत्या. तर शेकाप नेते आस्वाद पाटील यांच्या त्या मातोश्री होत्या. मीनाक्षी पाटील यांच्या निधनाबद्दल राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात आला. एक अभ्यासू महिला नेता अशी त्यांची ख्याती होती.

मीनाक्षी पाटील यांना त्यांचे वडील प्रभाकर पाटील यांच्याकडून राजकारणाचा वारसा लाभला होता. शालेय जीवनापासूनच त्यांनी राजकारणाचे धडे गिरविण्यास सुरवात केली होती. राजकारणात येण्याआधी त्यांनी पत्रकारितेतही काही काळ काम केले. वाचनाची प्रचंड आवड असल्याने त्यांचे वक्तृत्व समृद्ध झाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करून मीनाक्षी पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखदायक आहे. रायगड जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या एक झुंजार नेत्या अशी त्यांची ख्याती होती. प्रत्येक जनआंदोलनात त्या अग्रस्थानी असायच्या. मीनाक्षीताईंच्या निधनाने राजकीय क्षेत्रातील एक अभ्यासू, कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपले आहे. पाटील कुटुंबियांच्या दुःखात सहवेदना व्यक्त करतो. भावपूर्ण श्रद्धांजली!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top