सत्ता काय करू शकते! अजित पवारांची दादागिरी मोक्कातून सोडवले! 25 हजार कोटी माफ केले

पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार हे वादग्रस्त विधाने करण्याबाबत प्रसिद्धच आहेत. काल रात्री एका सभेत बोलताना त्यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. अजित पवार भाषणात म्हणाले की, ओळखीच्या एका कार्यकर्त्याला मोक्का लागणार होता. त्याला मी मोक्कातून वाचवले. ते पुढे आणखी म्हणाले की, साखर कारखान्याचा 25 हजार कोटींचा आयकरही मोदी-शहांकडून माफ करून घेतला. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी जाब विचारला.
बारामतीच्या निरावागज येथील सभेत बोलताना अजित पवार म्हणाले, बारामतीमध्ये एका माणसाचे नाव सांगा जो दादागिरी करतो, त्याला बघून मी घेतो. सर्वांना सारखा न्याय मिळाला पाहिजे. दादागिरी, गुंडगिरी आता चालणार नाही. नानाच्या एका ओळखीच्या माणसाला मोक्का लागत होता. मला सर्वांनी सांगितले. बनकर आले, सागर आले. म्हटले, एवढ्या वेळी वाचवा. त्यांना म्हणालो एवढ्याच वेळेस. परत चुकला तर अजित पवाराकडे यायचे नाही. अधिकारी म्हणतात, दादा तुम्ही एवढे कडक वागता आणि हे कसे पाठीशी घालता? तेव्हा माझापण कमीपणा होतो. पण जीवाभावाची माणसे म्हणून मलाही अडचण होते. मलाही थोडेफार यामध्ये माघारी फिरावे लागते. मात्र आता तसे कोणी होऊ देऊ नका.
अजित पवार यांनी या सभेत साखर कारखान्यावरील कोट्यवधींचा आयकर कसा माफ झाला, हेही सांगितले. ते म्हणाले की, आपल्यावर आयकरची 10 हजार कोटी रुपयांची टांगती तलवार होती. आयकरने ठरवले असते, तर खाती जप्त केली असती. 20 वर्षे तो कर माफ होत नव्हता. पण मोदी साहेबांनी माफ केला. अमित शहांनी माफ केला. तो माफ केला नसता, तर नाकीनऊ आले असते. सरकार आपल्या विचारांचे आहे, म्हणून आपण हे सर्व करू शकतो.
अजित पवार यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने सडकून टीका केली नसती तरच नवल. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित पवारांनी मोक्कापासून वाचवणे ही बाब धक्कादायक आहे. त्यांनी नेमके कोणाला वाचवले, कोणत्या केसमधून वाचवले आणि मोक्कामधून वाचवण्याची कारणे कोणती होती याची माहिती जनतेला द्यायला हवी आणि सरकारनेदेखील याचे उत्तर द्यायला हवे.
तर आ. जितेंद्र आव्हाड एक्स खात्यावरून खोचक प्रतिक्रिया देत म्हणाले की, दादा खरंच मोकळ्या मनाचा माणूस आहे. तसाच भोळाही आहे. बघा ना, उभ्या महाराष्ट्राला सांगितले की, मी मोक्कातला आरोपी सोडवला. 25 हजार कोटीचा इन्कम टॅक्स माफ करून घेतला. भारतात सत्ताधार्‍यांकडून हेदेखील घडू शकते, हे सांगणारा माणूस भोळा नसेल का? पण, काय दुर्दैव आहे आमच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हेही आम्ही काढू शकत नाही किंवा ज्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत, त्यांना मदतही करू शकत नाही. या देशात कायदा नमवण्यासाठी सत्ताधार्‍यांची किती चालते, हे सगळं दादा आपल्या तोंडून सांगून गेले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top