सलमान खानला इतके महत्त्व कशासाठी? मुख्यमंत्री शिंदे सतत भेटीला का धावतात?

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर रविवारी अज्ञातांनी गोळीबार केला. या प्रकरणाचा तपास सुरू असून, तिघांना ताब्यात घेतले आहे. पण या कारवाईपेक्षाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सलमानला भेटण्यासाठीची लगबग आश्‍चर्यजनक आहे.
सलमानला भेटायला याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे त्याच्या घरी पोहोचले. या भेटीच्या नंतर लगेच सलमानच्या घरावर गोळीबार झाला. ही घटना घडल्यानंतर खरेतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हालचाल करायला हवी. ते पोलिसांच्या संपर्कात असतीलच. पण त्यांच्यापेक्षा मुख्यमंत्री शिंदे यांची जास्त धावाधाव सुरू झाली. प्रचार दौरा सुरू असूनही मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर सलमानला फोन करून त्याची चौकशी केली. काल रात्री 11 नंतर ते सलमानच्या घरी भेटीला गेले असे वृत्त आहे. त्यानंतर आज दुपारी ते अधिकार्‍यांसह सलमानच्या घरी दाखल झाले. त्यांनी सलमानच्या कुटुंबाशी अर्धा तास चर्चा केली. तिथून बाहेर पडल्यावर प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. दरम्यान, सलमान खानच्या घरावरील गोळीबाराच्या तपासाबाबत सक्रियता दाखवणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझे पती अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा तपास जराही पुढे सरकत नसल्याबद्दल काहीही केले नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया तेजस्विनी घोसाळकर यांनी व्यक्त केली.
आपल्या सलमानच्या सुरक्षेची जबाबदारी आमची आहे असे म्हणत आतापर्यंतचा चौकशीचा तपशीलही सांगितला. लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना प्रचार, बैठका सोडून मुख्यमंत्री शिंदे हे सलमानच्या प्रकरणात इतके लक्ष का घालत आहेत? अशी चर्चा मुंबईतच सुरू झाली आहे.
वांद्रा येथील ए-1 बेकरीसमोर झोपलेल्या मजुरांच्या अंगावर गाडी धडकल्याच्या प्रकरणात सलमान खान निर्दोष सुटला. मात्र त्यानंतर चिंकारा शिकार प्रकरणातील एका गुन्ह्याबद्दल त्याला 2018 साली दोषी ठरवून पाच वर्षे कैदेची शिक्षा झाली होती. त्यात तो वरील न्यायालयात
निर्दोष ठरला. मात्र राजस्थान सरकारने त्याविरोधात अपील केले. राजस्थान उच्च न्यायालयात या प्रकरणातील सर्व याचिकांची सुनावणी प्रलंबित आहे. सलमान नामांकित अभिनेता आहे. त्याच्या घरावर गोळीबार झाला तर चौकशी झाली पाहिजे. पण मुख्यमंत्री शिंदे यांची त्यासाठी जी धावपळ सुरू आहे ती कशासाठी आहे, हा सवाल उपस्थित झाला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top