सांगलीतील माहिती अधिकार कार्यकर्त्याची निर्घृण हत्या

सांगली : कुरूंदवाड-नांदणी रस्त्यावरील एका शेताजवळ सांगली येथील बेपत्ता माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष विष्णू कदम (३६) याची धारदार चाकूने वार करून हत्या करण्यात आली. कदम याचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह कारमध्ये आढळून आला. गुरुवारी रस्त्यावरून जाणार्‍या शेतकर्‍यांच्या दक्षतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. कुरुंदवाड-नांदणी रस्त्यावरील एका शेताजवळ अनोळखी कार उभी असलेली काही शेतकर्‍यांना दिसली. एका शेतकर्‍याने वाहनात डोकावून पाहिले असता कारच्या ड्रायव्हर सीटच्या बाजूच्या सीटवर एक युवक रक्तबंबाळ अवस्थेत दिसला. त्या शेतकर्‍याने तत्काळ पोलिस ठाण्याशी संपर्क साधून संबंधित माहिती दिली. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस पोलिस फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी गाडीतून दोन धारदार चाकू जप्त केले. शिवाय मृत संतोष याचा मोबाईल फुटलेल्या अवस्थेत सापडला. फॉरेन्सिक लॅबच्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत वाहनाची दरवाजे खुली करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. दतवाड ग्रामीण रुग्णालयात शिवविच्छेदन करण्यात आले आहे. सांगलीतील तरूणाचा कुरूंदवाड येथे खून झाल्याने खळबळ उडाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top