साध्वी प्रज्ञा सिंह अखेर कोर्टात हजर! हात थरथरतात म्हणून अंगठ्याचा वापर

मुंबई – मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर न्यायालयाने तंबी दिल्यानंतर अखेर काल सुनावणीसाठी हजर राहिल्या. जबाब नोंदविताना त्यांनी सांगितले की, आपली प्रकृती आजही ठीक नाही. हात थरथरतात. हाती पेनही धरता येत नाही. त्यामुळे नोंदविलेल्या जबाबावर सही करता येणार नाही. सबब आपल्याला जबाबाच्या खाली सहीऐवजी अंगठा लावण्याची परवानगी द्यावी. त्यांची मागणी न्यायालयाने मान्य केली.
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या २००८च्या मालेगाव बाँबस्फोट खटल्यातील मुख्य आरोपी आहेत. त्या भोपाळ लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत. मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात प्रज्ञा सिंह यांच्यावर अन्य पाच आरोपींविरोधात मोक्कासह विविध कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हा खटला विशेष मोक्का न्यायालयात सुरू आहे. अन्य आरोपींचे जाबजबाब नोंदविले गेले आहेत. मात्र प्रज्ञा सिंह या प्रकृतीच्या कारणास्तव सुनावणीदरम्यान वारंवार गैरहजर राहिल्या. त्यामुळे हा खटला बराच काळ रेंगाळला आहे. त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत न्यायालयाने गेल्या ११ मार्च रोजी अखेरची तंबी दिली होती. २५ एप्रिल रोजी सुनावणीस जातीने हजर न राहिल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल,असे न्यायालयाने बजावले होते. त्यामुळे प्रज्ञा सिंह गुरुवारी न्यायालयात हजर राहिल्या आणि त्यांनी आपला जबाबही नोंदविला. यापुढील प्रत्येक सुनावणीदरम्यान त्यांना न्यायालयात जातीने हजर रहावे लागणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top