साबरमती-आग्रा सुपरफास्ट एक्सप्रेसचे ४ डबे घसरले

जयपूर

राजस्थानच्या अजमेर येथील मदार रेल्वे स्थानकाजवळ काल मध्यरात्री १.१० वाजण्याच्या सुमारास साबरमती-आग्रा सुपरफास्ट एक्सप्रेस आणि मालगाडी यांची धडक झाली. दोन्ही गाड्या एकाच रुळावर आल्याने हा अपघात झाला. या अपघातात साबरमती एक्स्प्रेसच्या इंजिनसह ४ डबे रुळावरून घसरले. त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता. या अपघातात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली.

रात्री १२.५५ वाजताच्या सुमारास ही एक्सप्रेस अजमेर रेल्वे स्थानकातून निघाली. एक्सप्रेसने काही किलोमीटर प्रवास केल्यानंतर हा अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घसरलेल्या रेल्वेच्या डब्यातून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोको पायलटने ट्रेन थांबवण्यासाठी आपत्कालीन ब्रेकही लावला, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. दोन गाड्या एकमेकांसमोर आल्या आणि अपघात झाला. एक्सप्रेस इंजिनसह ४ जनरल डबे रुळावरून घसरले. अपघाताच्या वेळी ट्रेनमध्ये बसलेल्या लोकांना धक्का बसला आणि सीटवर झोपलेली मुले, महिला आणि वृद्ध सीटवरून खाली पडले. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला. त्यामध्ये रुळावरून घसरलेल्या डब्यांची तपासणी सुरू असल्याचे आणि रुळावरून घसरलेले डबे आणि इंजिन पुन्हा रुळावर आणण्याचे प्रयत्न रेल्वे अधिकारी करत असल्याचे दिसत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top