सीपीआय-एमचे संस्थापक सदस्य शंकरिया यांचे १०१ व्या वर्षी निधन

चेन्नई

स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ मार्क्सवादी नेते आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय-एम) संस्थापक सदस्य एन. शंकरिया यांचे काल वयाच्या १०१ व्या वर्षी चेन्नईत निधन झाले. वृद्धापकाळाशी संबंधित आजारांमुळे त्यांची प्राणज्योत मालवली. तामिळनाडुचे मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. शंकरिया यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील, अशी घोषणा त्यांनी केली.

लोकांसाठी केलेल्या उत्कृष्ट सेवेचे स्मरण करून मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. दडपशाहीविरुद्ध आयुष्यभर लढणाऱ्या शंकरिया यांचे जीवन आणि बलिदान इतिहासाच्या पानांमध्ये सदैव नोंदवले जाईल, असेही स्टालिन म्हणाले. १५ जुलै १९२२ रोजी शंकरिया यांचा जन्म झाला होता. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीदरम्यान मदुराई येथील अमेरिकन कॉलेजचे अल्पवयीन पदवीधर विद्यार्थी म्हणून तुरुंगवास भोगला होता. त्यांच्या १८ महिन्यांच्या तुरुंगवासामुळे त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत व्यत्यय आला आणि ते पदवीचे शिक्षण पूर्ण करू शकले नाही. मदुराई विद्यापीठाने अलीकडेच त्यांना देशासाठी केलेल्या सेवांचा गौरव म्हणून मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्याचा निर्णय घेतला होता, पण राज्यपाल आर. एन. रवी यांनी या निर्णयाला विरोध केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top