सुकन्या समृध्दीसह छोट्या बचतयोजनांवरील व्याजदरात वाढ

नवी दिल्ली

केंद्र सरकारने नवीन वर्षापूर्वीच नागरिकांना एक मोठी भेट दिली आहे. जानेवारी-मार्च २०२४ तिमाहीसाठी सुकन्या समृद्धी योजना आणि ३ वर्षाच्या मुदत ठेवी सारख्या छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच सरकारने ही घोषणा केली आहे. सरकार दर तिमाहीत पोस्ट ऑफिसद्वारे चालवल्या जाणार्‍या छोट्या बचत योजनांवरील व्याजदर ठरवते.

अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या या परिपत्रकानुसार, आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीसाठी, सुकन्या समृद्धी योजनेचे व्याजदर ८ टक्क्यांवरून ८.२ टक्के करण्यात आले आहेत. याशिवाय ३ वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवरील व्याज ७ टक्क्यांवरून ७.१ टक्के करण्यात आले आहे. १ जानेवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत बचत ठेवींवर ४ टक्के व्याज मिळेल. १ वर्षाच्या ठेवीवर ६.९ टक्के व्याज, २ वर्षांच्या मुदत ठेवीवर ७ टक्के व्याज आणि ५ वर्षांच्या ठेवीवर ७.५ टक्के व्याज मिळेल. ५ वर्षांच्या आवर्ती ठेवींवर ६.७ टक्के व्याज कायम ठेवण्यात आले आहे. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील व्याजदर ७.७ टक्के कायम ठेवण्यात आला आहे. किसान विकास पत्रामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना ७.५ टक्के व्याज मिळेल आणि ते ११५ महिन्यांत परिपक्व होईल. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर या तिमाहीत ८.२ टक्के व्याज मिळेल. पोस्ट ऑफिस मंथली इनकम अकाऊंट स्कीममधील गुंतवणुकीवर ७.४ टक्के व्याज मिळेल. दरम्यान, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) मध्ये गेल्या ३ वर्षात कोणताही बदल केलेला नाही. पीपीएफच्या व्याजदरात एप्रिल-जून २०२० मध्ये बदल केला होता. जेव्हा तो ७.९ टक्क्यांवरून ७.१ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला होता. त्यामुळे पीपीएफचे गुंतवणूकदार पुन्हा एकदा निराश झाले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top