सुरतमधील १८ महिन्याच्या बाळामुळे मुंबईत १४ वर्षांच्या मुलाला जीवदान

मुंबई- सूरतमधील एका १८ महिने वयाच्या ब्रेनडेड म्हणजेच मेंदू-मृत्यू झालेल्या बाळाने मुंबईत एका १४ वर्षांच्या मुलाला जीवदान दिले आहे.या बाळाचे यकृत काढून मुंबईत नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये १४ वर्षांच्या मुलावर त्याच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली.
यकृत प्रत्यारोपण करण्यात आलेला मुलगा नाशिकचा रहिवासी असून त्याला एक दुर्मिळ अनुवांशिक विकार असल्याचे निदान झाले होते. त्यामुळे त्याच्या कोलेस्टेरॉलची पातळी खूपच जास्त होती.त्याला लहान वयातच हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक येण्याचा धोका होता.अवयव प्रत्यारोपणाच्या प्राप्तकर्त्यांच्या प्रतीक्षा यादीत त्याचे नाव एप्रिल २०२२ पासून होते.
दुसरीकडे सूरतमधील १८ महिन्यांचा मुलगा घरी पडला व त्याला खासगी रुग्णालयात दाखल केल्यावर त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्याचे अवयव दान करण्यासाठी त्याच्या कुटुंबियांनी संमती दिली. त्यानंतर या बालकाचे यकृत काढून घेण्यात आले. प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यासाठी सुरतमधील खासगी रुग्णालयातून मुंबईतील नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे यकृत नेण्यात आले. त्याकरीता २८१ किमी अंतराचा आंतरराज्य ‘ग्रीन कॉरिडॉर’ स्थापन करण्यात आला.गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यांतील पोलिस अधिकाऱ्यांच्या सहकार्याने ४ तास २० मिनिटांत २८१ किमी अंतर कापून यकृताची जलद वाहतूक करण्यात आली. त्यानंतर मुंबईच्या नानावटी मॅक्स हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपण शस्त्रक्रिया विभागाचे संचालक डॉ.अनुराग श्रीमाळ आणि नानावटी मॅक्स इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर, इन्टेस्टाईन अँड पॅन्क्रिया ट्रान्सप्लांट या संस्थेतील पेडियाट्रिक हेपॅटोलॉजी व गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी या विभागाचे संचालक डॉ. विभोर बोरकर यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या पथकाने हे प्रत्यारोपण केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top