स्वप्नवत दुमजली राममंदिर तयार छोटी मंदिरे, स्तंभ, प्रदक्षिणा मार्गांचा थाट

लखनौ – अयोध्येतील नव्या अतिभव्य राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेचा सोहळा 22 जानेवारी रोजी होणार आहे. या दिमाखदार सोहळयाची तयारी अंतिम टप्प्यात आली असतानाच भाविकांना रामलल्लाच्या दर्शनाचे वेध लागले आहेत. मंदिराच्या बांधकामाविषयी माहिती देण्यासाठी आज राममंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की, हे दुमजली मंदिर 70 एकर जमिनीतील उत्तर भागात बांधले जात आहे. पुढील 7 ते 8 महिन्यांत याच परिसरात रामाला प्रिय असलेल्या भक्तांची आणखी छोटी 7 मंदिरे येथे बांधली जाणार आहेत. ध्वजस्तंभ, सूर्यस्तंभ उभारले जात आहेत.
सध्या अयोध्येमध्ये दररोज 80 हजार भाविक दर्शनासाठी येत असल्याचा अंदाज असून प्राणप्रतिष्ठेनंतर हा आकडा 2 लाखांवर जाण्याची शक्यता आहे. बांधकामासोबतच मंदिराच्या आवारात चार वेदांचे पारायण आणि यज्ञ सतत चालू आहे. हे प्रतिष्ठापनेपर्यंत सतत चालू राहणार आहे. चंपत राय यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, राममंदिर 70 एकर जमिनीत उत्तर भागात बांधले जात आहे. मे 2022 मध्ये हे बांधकाम सुरू झाले. 40 मीटर खोल खोदून पाया तयार करण्यात आला. या मंदिराचा तळमजला तयार असून पहिल्या मजल्यावर बांधकाम चालू आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जाण्यासाठी 32 पायर्‍या चढून जावे लागणार आहे. राजस्थानचा बनसी पहरपूरचा गुलाबी वाळूचा 4 लाख 70 हजार टन इतका खडक मंदिराच्या उभारणीसाठी वापरला जात आहे. आतील बाजूस मकराना पांढर्‍या संगमरवरचा उपयोग होत आहे. मंदिराच्या बांधकामात कुठेही लोह, स्टीलचा वापर नसून खाच्यात ब्लॉक अडकवून पूर्ण बांधकाम केले आहे. हे मंदिर 1 हजार वर्षे टिकेल, असे बांधण्यात आले आहे.
चंपत राय पुढे म्हणाले, राम मंदिराच्या तळमजल्यावर रामलल्लाच्या 5 फूट उंचीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या नव्या मूर्तीबरोबर रामलल्लाची आधीची मूर्तीही विराजमान असेल. यासोबतच भरत, लक्ष्मण व शत्रुघ्न यांच्याही पुरातन मूर्ती असतील. मंदिराच्या पहिल्या मजल्यावर राम दरबार असेल. तिथे राम व तिघा बंधूंसह सीतामाईची मूर्ती असेल. पहिल्या मजल्यावर परिक्रमा मार्ग असणार आहे. पहिल्या मजल्यावर 132 व दुसर्‍या मजल्यावर 160 खांब असतील. मंदिराच्या आवारात पुढील 7 ते 8 महिन्यांत आणखी 7 मंदिरे बांधली जाणार आहेत. महर्षी वाल्मिकी, वाशिष्ठ, विश्वामित्र, अगस्त्य, निशाद राज, शबरी आणि अहिल्या यांची मंदिरे असतील. कुबेर टिला इथे जटायूची भव्य मूर्ती राहील. याशिवाय ठिकठिकाणी ध्वजस्तंभ, सूर्यस्तंभ उभारले जात आहेत. या मंदिराच्या आवारात यात्रेकरूंसाठी अनेक प्रकारच्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत. यामध्ये एकाच वेळी 25 हजार यात्रेकरूंना सामान ठेवण्यासाठी लॉकर, पाणी, 500 शौचालये, रुग्णालयाची व्यवस्था आहे. नगरपालिका महामंडळावर जबाबदारी वाढू नये यासाठी मंदिरातच मलवाहनाची सोय केली आहे. वीज देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.
रामलल्लाच्या मूर्तीविषयी चंपत राय म्हणाले, मूर्तीसाठी 5 वर्षांच्या मुलाचे रेखांकन तयार केले गेले आहे. अंगठा माथ्यापर्यंतची उंची 51 इंच आहे. अशा 3 मूर्ती बनवल्या जात आहेत. ज्या मूर्तीमध्ये देवत्व आणि लहान बालकाची प्रवेशयोग्यता असेल ती मूर्ती निवडली जाणार आहे. कर्नाटकमधील दगडांनी दोन मंदिरे बांधली जात आहेत. एक मकरानापासून बनविले जात आहे. दक्षिणेकडे हनुमानाचे मंदिर असणार आहे, तर पूर्वेकडील दिशेने प्रवेशद्वार असेल, ज्यात दिव्यांग लोकांसाठी विशेष सुविधा असणार आहे. मंदिराचे तिसर्‍या आणि शेवटच्या टप्प्यातील बांधकाम डिसेंबर 2025 पर्यंत
पूर्ण होईल. प्राणप्रतिष्ठा सोहळयासाठी सुमारे 8 हजार मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. यात जवळजवळ चार हजार संतमहंत असून कला, क्रीडा, सांस्कृतिक, राजकीय अशा विविध क्षेत्रांतील सुमारे अडीच हजार मान्यवरांना निमंत्रण पत्रिका पाठवल्या आहेत. महाराष्ट्रात प्राणप्रतिष्ठा सोहळयाच्या आमंत्रणावरून राजकीय वाद सुरु आहे, मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते सीताराम येच्युरी, प्रकाश करात, वृंदा करात यांच्याप्रमाणे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राम मंदिराच्या उद्घाटनाला उपस्थित न राहण्याचा निर्णय
घेतला आहे.
अयोध्या स्थानक
आता अयोध्या धाम जंक्शन

उत्तर प्रदेश सरकारने अयोध्या जंक्शन रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे अयोध्या रेल्वे स्थानक अयोध्या धाम जंक्शन या नावाने ओळखले जाणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोन दिवसांपूर्वी अयोध्या धाम स्टेशन नाव ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंदिर उभारणीत महाराष्ट्रातील
8 पैकी 5 मुख्य अभियंते

राममंदिर उभारण्यासाठी मराठीजनांनी मोलाचा वाटा उचलला आहे. मंदिर प्रकल्प उभारणीत आठपैकी पाच मुख्य अभियंते हे महाराष्ट्रातील आहेत. त्यात डॉ. जगदीश आफळे (पुणे), गिरीश सहस्त्रभोजनी (गोवा), जगन्नाथ गुळवे (संभाजीनगर), सुभाष चौधरी (जळगाव), अविनाश संगमनेरकर (नागपूर) यांचा समावेश आहे. टाटा कन्सल्टन्सीतर्फे राधेय जोशी (पुणे), ‘एल अँड टी’तर्फे सतीश चव्हाण (चाळीसगाव), साईट सिक्युरिटी मॅनेजर संतोष बोरे (बोरिवली) हेदेखील मंदिर उभारणीत आहेत. पुण्यातील पद्मावती भागातील रहिवासी असलेले डॉ. आफळे यांना देश-परदेशातील मोठे बांधकाम प्रकल्प उभारणीचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांची पत्नी माधुरी यादेखील मंदिर शिल्पकलातज्ज्ञ आहेत. हे दोघेही गेल्या साडेतीन वर्षांपासून अयोध्येत मंदिर उभारणीच्या कार्यात पूर्ण वेळ सहभागी आहेत.

पुण्याचे केशव पथक
शंखनादासाठी आमंत्रित

प्राणप्रतिष्ठेच्या नंतर मंदिर परिसरात शंखनाद करण्यासाठी पुण्यातील केशव शंखनाद पथकाला आमंत्रित केले आहे. या पथकात 111 वादक आहेत. 23 व 24 जानेवारी या दोन दिवशी राम दरबार परिसर, हनुमान गढी, लता मंगेशकर चौक व इतर सुनियोजित ठिकाणी हे पथक शंखनाद
करणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top