२१ राज्यांतील पहिल्या टप्प्यात त्रिपुरामध्ये सर्वाधिक मतदान

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील १०२ जागांवर आज मतदान पार पडले. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. याशिवाय अरुणाचल प्रदेशच्या ६० आणि सिक्कीमच्या ३२ विधानसभा जागांसाठीही मतदान झाले. २०१९ मध्ये लोकसभेच्या या १०२ जागांपैकी भाजपने ४० द्रमुकने २४ आणि काँग्रेसने १५ जागा जिंकल्या होत्या. इतरांना २३ जागा मिळाल्या होत्या. आज २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील १०२ जागांवर सरासरी ७० टक्के मतदान झाले. २१ राज्यांपैकी त्रिपुरामध्ये सर्वाधिक म्हणजेच ७५ टक्के मतदान झाले. गेल्या अनेक महिन्यांपासून हिंसाचाराने उफाळलेल्या मणिपूरमध्ये ७० टक्के मतदान झाले, तर सर्वात कमी मतदान लक्षद्वीपमध्ये झाले.
पहिल्या टप्प्यात मणिपूरच्या दोन लोकसभा जागांवर (मणिपूर अंतर्गत आणि मणिपूर बाह्य) मतदान पार पडले. मणिपूरमधील लोकसभेच्या दोन जागांवर आज मतदान सुरु असताना मतदानावेळी गोळीबार झाल्याच्या घटना घडली. या गोळीबारात ३ जण जखमी झाले. अचानक झालेल्या गोळीबारामुळे मतदानासाठी रांगेत उभ्या असलेल्या मतदारांमध्ये खळबळ उडाली. तसेच ईव्हीएमचीही तोडफोड झाल्याचे सांगण्यात आले. यानंतर बाह्य मणिपूर आणि अंतर्गत मणिपूरच्या काही भागांमध्ये कडक सुरक्षाव्यवस्थेत मतदान पार पडले. मात्र या घटनेनंतर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आरोप-प्रत्यारोप केले.
दरम्यान, पश्चिम बंगालमधील कूचबिहार लोकसभा मतदारसंघात चंदामारी येथे मतदान केंद्रासमोर दगडफेकीची घटना घडली. चंदामारी येथे मतदारांना मतदान करण्यापासून रोखण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून ही दगडफेक करण्यात आली, असा आरोप भाजपाने केला आहे. तसेच या दगडफेकीमध्ये भाजपाचा एक पोलिंग एजंट हा जखमी झाला आहे. तसेच केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते निशित प्रामाणिक यांच्या घराजवळ बॉम्ब सापडला. हा बॉम्ब पोलिसांनी हटवला. पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या ४२ जागा असून, येथे ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पक्ष आणि भाजपा यांच्यात मुख्य लढत होणार आहे. तर काँग्रेस आणि डावे पक्ष हे या दोघांनाही आव्हान देत आहे.
तामिळनाडूतील दिंडीगुल येथे १०२ वर्षीय महिला रेड्ड्यारछत्रम यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. बिहारमधील नक्षलग्रस्त भागात दुपारी ४ वाजता मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली. नागालँडमधील मोन, लाँगलेंग, तुएनसांग, नोक्लाक, शामटोर आणि किफिरे या ६ जिल्ह्यांमध्ये जवळपास कमी मतदान झाले. ईस्टर्न नागालँड पीपल्स ऑर्गनायझेशन या जिल्ह्यांसाठी स्वतंत्र प्रशासन आणि अधिक आर्थिक स्वातंत्र्याची मागणी करत आहे. या संघटनेने या जिल्ह्यांतील जनतेला निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. दुसर्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल रोजी होणार आहे.
१०२ जागांवरील मतदानाची टक्केवारी
उत्तर प्रदेश – ६० टक्के, मेघालय – ६५ टक्के, मिजोराम – ५५ टक्के, राजस्थान – ६० टक्के, नागालैंड- ६५ टक्के, पुडुचेरी – ७० टक्के, उत्तराखंड- ५५ टक्के,
पश्चिम बंगाल – ७५ टक्के, मध्यप्रदेश – ६५ टक्के, जम्मू काश्मीर ६२ टक्के, बिहार- ४५ टक्के, त्रिपुरा- ७५ टक्के, अरुणाचल- ६० टक्के, महाराष्ट्र- ५८ टक्के,
तामिळनाडू – ६२ टक्के, सिक्कीम- ६० टक्के, लक्षदिप- ४७ टक्के, मणिपूर – ७० टक्के, अंदमान-निकोबार – ५० टक्के, आसाम – ६९ टक्के, छत्तीसगढ- ६५ टक्के

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top