13 Deaths in Nagpur Amid Heatwave – राज्यभर उष्णतेच्या लाटेचा कहर वाढला असून, नागपूर शहरात मागील 10 दिवसांत 13 नागरिकांच्या नैसर्गिक मृत्यूची नोंद झाली आहे. या मृत्यूंकडे उष्माघाताच्या संशयित घटनांप्रमाणे पाहिले जात असून, आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाच तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आठ जणांच्या नैसर्गिक मृत्यूची नोंद झाली आहे.
मृतांमध्ये 32 ते 55 वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, गेल्या वर्षीदेखील अशाच प्रकारे सुमारे 40 जणांच्या मृत्यूमागे उष्माघाताचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, शवविच्छेदन अहवालात उष्माघात हे मृत्यूचे नेमके कारण असल्याचे स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, राज्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, एप्रिल महिन्यातच तापमानाने अनेक विक्रम मोडले आहेत. कोकणापासून विदर्भापर्यंत अनेक भागांमध्ये तापमान 45 अंश सेल्सियसच्या पुढे गेले आहे. राज्यात आतापर्यंत उष्माघातामुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी परभणी, नागपूर, हिंगोली आणि लातूर येथे उष्माघातामुळे मृत्यूची नोंद झाली. लातूरमध्ये गेल्या आठवडाभरात उष्णतेच्या तडाख्याने तिघांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये एक तरुण शेतकर्यासह एका लहान बाळाचाही समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याशिवाय अकोला, वाशिम, बुलडाणा आणि अहिल्यानगरमध्येही उष्म्यामुळे मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. 1 मार्च ते 25 एप्रिल दरम्यान राज्यात उष्माघाताचे एकूण 39 रुग्ण आढळले असून, अकोल्यात सात, नंदुरबारमध्ये पाच आणि रत्नागिरीत चार रुग्णांची नोंद झाली आहे. हवामान विभागाने विदर्भासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना पुढील काही दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर राज्याचा आपत्ती व्यवस्थापन विभागही सज्ज झाला असून, आवश्यक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
नवापुरात तापलेल्या रस्त्यावर ऑम्लेट
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे तापमानाचा पारा 45 अंशांवर पोहोचला आहे. उष्णतेची तीव्रता इतकी भीषण आहे की, विसरवाडीजवळ धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर एका तरुणाने तापलेल्या डांबरी रस्त्यावर थेट अंड्याचे ऑम्लेट बनवून दाखवले. विसरवाडी येथील शिवम ऑटो गॅरेजचे मालक चेतन मराठे यांनी उष्णतेची तीव्रता दाखवण्यासाठी डांबरी रस्त्यावर अंडे फोडून त्याचे ऑम्लेट बनवून दाखवले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.









