इंडोनेशियात भुस्खलन १४ जणांचा मृत्यू

बाली
इंडोनेशियात आज झालेल्या भुस्खलनात १४ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून तीन जण बेपत्ता आहेत. घटना स्थळी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरु आहे.
टोरेंटियल पावसामुळे इंडोनेशियाच्या सुलवेसी बेटावर हे भुस्खलन झाले. काल मध्यरात्री झालेल्या या भुस्खलनामुळे चार घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली. सुलवेसी बेटाच्या दक्षिणेला असलेल्या टाना टोरोजा जिल्ह्यात घडलेल्या या घटनेतील एका घरात कौटुंबिक कार्यक्रम असल्याने मोठी जिवितहानी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. सभोवताली असलेल्या डोंगरांमधून मोठ्या प्रमाणात वाहून आलेल्या चिखलाखाली ही घरे दबली गेली. बचाव पथकाने दोन जखमींना ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढले असून यामध्ये एका आठ वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. आज दुपारी मकाले गावातून ११ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ३ शव दक्षिण मकालेमधून काढण्यात आले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांमध्ये एका तीन वर्षाच्या मुलीचा समावेश असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. या ठिकाणी सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे व दलदलीमुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. टाना टोरोजा हे इंडोनेशियामधील पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. परंपरागत घरांबरोबरचं लाकडी पुतळे व गुहेमध्ये सापडलेल्या मानवी सांगाड्यामुळे तिथे अनेक पर्यटक जात असतात. यंदा सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे इंडोनेशियात आतापर्यंत भुस्खलनाच्या १७ हजार घटना घडलेल्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top