नितीशकुमार मतदारांची चेष्टा करतात! ‘इंडिया’त दुःखी झाले म्हणत कमळावर बसले

पाटणा- जे मतदार आपल्याला निवडून देतात त्यांच्या निर्णयाचा जराही सन्मान न ठेवता राजकारणी आता सत्तेसाठी वाटेल ते करू लागले आहेत. या सत्तापिपासू, ध्येयशून्य, धोरणशून्य नीतीशून्य राजकारणाच्या शर्यतीत देशभरातील अनेक नेते आहेत. पण या शर्यतीत सध्या पहिला क्रमांक नितीशकुमार यांनी पटकावला आहे. संघ परिवार आणि भाजपाबरोबर जाण्यापेक्षा मातीत विलीन होईन असे म्हणत ‘इंडिया’ आघाडीच्या स्थापनेचा पुढाकार घेणारे नीतिशकुमार पलटूश्रेष्ठ आज कमळावर जाऊन बसले. ‘इंडिया’त पंतप्रधानपदाचे स्वप्न भंगताच मुख्यमंत्री खुर्चीचा लोण्याचा गोळा महत्त्वाचा वाटला.
नितीशकुमार यांनी आज नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे, पाच वर्षांच्या कार्यकाळात नितीशकुमार यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ‘भारत माता की जय’ आणि ‘जय श्री राम’च्या घोषणा देत त्यांनी शपथ घेतली, तेव्हा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित होते. बिहारच्या राजभवनात संध्याकाळी झालेल्या या कार्यक्रमात नितीशकुमार यांच्यासह 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली. त्यात भाजपाकडून सम्राट चौधरी, विजयकुमार सिन्हा, डॉ. प्रेमकुमार आणि जदयूकडून विजयकुमार चौधरी, बिजेंद्र प्रसाद यादव, श्रावणकुमार, तर संतोषकुमार सुमन (हिंदुस्तानी अवामी पक्ष), सुमीतकुमार सिंह (अपक्ष) यांचा समावेश होता. यातील सम्राट चौधरी आणि विजयकुमार सिन्हा हे उपमुख्यमंत्री असतील. नितीशकुमार यांचा शपथविधी सोहळा चालू असताना सभागृहात ‘नितीशकुमार की जय, मोदी… मोदी आणि जय श्रीराम’ची घोषणाबाजी होत होती. शपथविधी झाल्यावर लगेच मंत्रिमंडळाची बैठकही पार पडली.
गेले दोन दिवस बिहारमध्ये राजकीय उलथापालथीचे संकेत मिळत होते. नितीशकुमार लालूप्रसाद यांच्या राष्ट्रीय जनता दलाची साथ सोडून भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या गोटात जाणार हे काल जवळजवळ निश्चित झाले होते. जदयू आणि राजद या दोन्ही पक्षांच्या आमदारांच्या बैठकांचे सत्र सुरू होते. काँग्रेसनेही नितीशकुमार यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु नितीशकुमार यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णयावर ठाम होते. आज सकाळी नितीशकुमार यांनी जनता दल (संयुक्त) विधिमंडळाच्या बैठकीत राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. तसेच महागठबंधन सरकार बरखास्त करून एनडीए सरकार स्थापन करण्याचा दावाही केला. भाजपाच्या पाठिंब्याचे पत्र त्यांनी राज्यपालांना सादर केले. त्यानंतर राज्यपालांनी नितीशकुमार यांना संध्याकाळी शपथविधीसाठी बोलावले. त्यानंतर भाजपाच्या गोटातील हालचालीही वाढल्या. सकाळी नितीशकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून बातचीत केली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा. इतर सात जणांसह चार्टर्ड विमानाने पाटण्याला पोहोचले.
मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन राजभवनातून बाहेर आल्यावर नितीशकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना काँग्रेस आणि राजदवर टीका केली. ते म्हणाले, तुम्हाला सगळ्यांनाच ठाऊक आहे की, इंडिया आघाडी कशी आकाराला आली आणि मी सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी कसे एकत्र आणले. परंतु गोष्टी मनासारख्या होत नव्हत्या. आघाडीसाठी कुणीच काही करत नव्हते. इंडिया आघाडीने माझा अपेक्षाभंग केला. मी दुखावलो गेलो आहे.
राजदबरोबरच्या महागठबंधनबद्दल बोलताना नितीशकुमार म्हणाले की, राज्यकारभार योग्य रितीने चालत नव्हता, त्यामुळे माझ्यावर राजीनामा देण्याची वेळ आली. तुम्ही पत्रकारांनी मला यापूर्वी अनेकदा विचारले होते. परंतु तेव्हा मी बोलणे बंद केले होते. आम्ही सर्व परिस्थिती पाहत होतो. त्यानंतर मला लोक वेगवेगळे सल्ले देऊ लागले. मी माझ्या पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांचा सल्ला घेतला. त्यानंतर आज राजीनामा दिला आहे आणि आमचे सरकार विसर्जित केले.
नितीशकुमार यांच्या धक्कातंत्रामुळे संतापलेल्या राजदने नितीशकुमार यांच्यावर निशाना साधला. राजदने म्हटले की, भूमिका बदलण्यालाही काही सीमा असतात. परंतु नितीशकुमार यांनी त्या सगळ्या सीमा पार केल्या आहेत. त्यांनी वारंवार आघाड्या बदलून आपण संधीसाधू असल्याचे दाखवून दिले आहे. परंतु बिहारमधील जनतेला त्यांची नेमकी ओळख पटली आहे. राजदला याचा फायदाच होईल.
नितीशकुमार यांच्याविरोधात पोस्ट केल्याने चर्चेत आलेल्या लालू यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी एक्स अकाऊंटवर आणखी अनेक पोस्ट केल्या आहेत. त्यातील एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, कचरा पुन्हा कचराकुंडीत गेला. ‘कचराकुंडी मंडळाला दुर्गंधीदायक कचरा लखलाभ’ या मजकुरासह रोहिणी आचार्य यांनी कचराकुंडीत कचरा टाकतानाचा एक फोटोही जोडला आहे. त्याआधी त्यांनी आज पहाटेच आणखी एक पोस्ट टाकली. त्यात म्हटले की, जोपर्यंत श्वास चालू आहे, तोपर्यंत सांप्रदायिक शक्तींविरोधात आमची लढाई सुरुच राहील.
नितीशकुमार यांच्या भाजपासोबत जाण्याचा इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. कारण इंडिया आघाडी आकाराला आणण्यात नितीशकुमार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. नितीशकुमार यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, आम्ही एकत्र लढत होतो. परंतु असे काही होईल, याची मला कल्पना होती. लालू आणि तेजस्वी यांनी नितीश आघाडीला सोडून जात असल्याचे आणि ते आयाराम गयाराम असल्याचे सांगितले होते. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खा. संजय राऊत म्हणाले की, अयोध्येत तर बिहारमध्ये पलटूराम आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top