लंडनमध्ये ट्रकच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू

लंडन
लंडनमध्ये ट्रकने धडक दिल्यामुळे चेष्ठा कोचर या भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. मूळच्या गुरुग्रामच्या असलेल्या चेष्ठा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पीएचडी करत होत्या. १९ मार्च रोजी लंडनमध्ये त्या सायकल चालवत असताना एका ट्रकने त्यांना धडक दिली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. यावेळी त्यांचे पती प्रशांत हेदेखील त्यांच्या सोबत होते. ते थोडे पुढे गेले असता अचानक त्यांना मागून मोठा आवाज ऐकू आला. त्यांनी घटनास्थळी पाहिले असता आपल्या पत्नीला ट्रकची धडक बसल्याचे त्यांना कळले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि पॅरामेडिक्स यांनी घटनास्थळी धाव घेतली. उत्तर प्रदेशच्या बरेली येथे जन्मलेल्या चेष्ठा लंडनला जाण्याआधी गुरुग्राम येथे राहत होत्या. मागील सप्टेंबर महिन्यात त्या पीएचडीसाठी लंडन येथे गेल्या होत्या. लंडनमध्ये त्यांनी बिहेवियरल सायंसेस साठी यूनिट स्थापन केले होते. त्यांनी बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनसोबतदेखील काम केले होते. दिल्ली विद्यापीठाच्या अर्थशास्त्राच्या पदवीधर असलेल्या चेष्ठा कोचर यांनी यूनिव्हर्सिटी ऑफ शिकागोसह अनेक मोठ्या संस्थांमध्ये शिक्षण घेतले होते. त्यांनी यापूर्वी निती आयोगातही काम केले होते. त्यांचे पती सॉफ्टवेअर इंजिनियर असून या दोघांच्या लग्नाला अवघे एक वर्षच झाले होते.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार हा ट्रक कचरा गोळा करणारा होता. तपासासाठी इतरही चालकांची मदत घेतली जात असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top