चाकणला कांदा-बटाट्याची उच्चांकी आवक! एकूण उलाढाल ७ कोटी, ४० लाख रुपये

चाकण – खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये कांद्याची प्रचंड आवक झाली. हिरवी मिरची, आले व बटाट्याचीही मोठी आवक झाली. बटाट्याची आवक वाढूनही भाव कडाडले. जळगाव भूईमुग शेंगा व बंदूक भूईमुग शेंगांची काहीच आवक झाली नाही. लसणाची आवक व भाव स्थिर राहिले. फळभाज्यांच्या बाजारात हिरवी मिरची, कोबीची भरपूर आवक झाली. पालेभाज्यांच्या बाजारात मेथी, कोथिंबीर, शेपू व पालक भाजीची मोठी आवक झाली. जनावरांच्या बाजारात जर्शी गाई, बैल, म्हैस व शेळ्या – मेंढ्याच्या संख्येत वाढ झाली. एकूण उलाढाल ७ कोटी, ४० लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण १७ हजार ७५० क्विंटल आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ४,७५० क्विंटलने वाढल्याने भावात २०० रुपयांची घट झाली. कांद्याचा कमाल भाव २,४०० रुपयांवरून २,२०० रुपयांवर स्थिरावला. बटाट्याची एकूण आवक २,७५० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ८५० क्विंटलने वाढून भावात १०० रुपयांची वाढ झाली. बटाट्याचा कमाल भाव १,९०० रुपयांवरून २,००० रुपयांवर पोहोचला. जळगाव भुईमुग शेंगा व बंदूक भूईमुग शेंगांची काहीच आवक झाली नाही. लसणाची एकूण आवक ३० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक स्थिर राहून भावही २० हजार रुपयांवर स्थिरावले. हिरव्या मिरचीची एकूण आवक ४३० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ५५ क्विंटलने वाढली व भाव स्थिर राहिले. हिरव्या मिरचीला ३ हजार रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top