धारावी कोरोनाशी लढून जिंकली ती अदानीला शरण जाणार नाही

मुंबई – अदानी समूहाकडून होणार्‍या धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात धारावीतून महामोर्चा काढण्यात आला. धारावी कोरोनाशी लढून जिंकली, ती अदानीला शरण जाणार नाही. कोविड काळात सरकारने पात्र-अपात्र केले नाही. मग विकास करताना पात्र-अपात्र ठरवणारे तुम्ही कोण? धारावीकरांना 500 चौ. फुटांचे घर, तेही जिथल्या तिथे मिळाले पाहिजे. हा इशारा मोर्चा आहे. हा आवाज दिल्ली, अहमदाबाद आणि चेल्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. हा आवाज जर तुमच्या कानापर्यंत पोहोचत नसेल तर कानाखाली आवाज काढल्याशिवाय राहणार नाही, असा खणखणीत इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.
या मोर्चाला आधी पोलिसांनी परवानगी नाकारली होती, नंतर सशर्त परवानगी देण्यात आली. मोर्चा धारावी टी जंक्शन ते बीकेसीतील अदानी कार्यालयापर्यंत जाणार होता. पण पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे तो त्याआधी बीकेसीत फटाका मैदानापर्यंत नेण्यात आला आणि तिथे त्याचे सभेत रुपांतर झाले. तत्पूर्वी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील अदानी कंपनीच्या सुरक्षेसाठी 300 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दुपारी 3.30 वाजता मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात ठाकरे गटाव्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस, शेकाप, आप, रिपब्लिकन पार्टी, जनता दल सेक्युलर आदी इतर पक्षही सहभागी झाले होते. धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड, माजी आमदार बाबुराव माने, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, आमदार अनिल परब, सुभाष देसाई, अंबादास दानवे, किशोरी पेडणेकर, सुषमा अंधारे, अनिल देसाई, सचिन अहिर, विनायक राऊत, वरुण सरदेसाई मोर्चात सहभागी झाले होते.
उद्धव ठाकरे भाषणात म्हणाले की, 50 खोके कमी पडायला लागले, म्हणून धारावी आणि मुंबई हे बोके गिळायला निघाले आहेत. यांना वाटते की कोणी जाब विचारू शकत नाही. जे प्रश्न विचारतात त्यांना सभागृहातून निलंबित केले जाते. सरकार आपल्या दारी नाही, हे सरकार अदानीच्या दारी आहे. देवेंद्र आणि कंपनी अदानीची बाजू मांडतात. उद्धव ठाकरे टीडीआर लॉबीची बाजू घेते, असा आरोप करतात, मग तुम्ही अदानीचे बूट का चाटता? अदानीवर सवलतींची खैरात केली आहे त्याचा परिणाम मुंबई, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. अडीच वर्षे यशस्वीपणे चालणारे सरकार यांनी गद्दारी करून पाडले, त्यासाठी खोके कोणी पुरवले असतील, हे तुम्हाला आता कळले असेल. मुंबईवर कोणतेही संकट आले की पहिला धावतो तो शिवसैनिक. पण यांना जेव्हा कळले की हा माणूस बसलाय तोपर्यंत मुंबई गिळता येणार नाही, म्हणून माझ्याविरोधात कट केला. महाविकास आघाडी काळात धारावीचा गळा घोटला जाईल, असा एकही जीआर काढलेला नाही. पण आज आवई उठवली जाते की शिवसेना विकासाच्या विरोधात आहे. मी गेली 60 वर्षे कलानगरमध्ये राहतो. तेव्हा धारावी चौफेर पसरलेली खाडी होती. सरकारी कर्मचारी वसाहत तेव्हाही होती. त्यांच्या पेंशन योजनेसाठीही मी पाठिंबा दिला. या कर्मचार्‍यांना घर देण्याचा निर्णय आम्ही तत्काळ घेतला, तसा तुम्हीही धारावीकरांच्या घरासाठी तत्काळ निर्णय घ्या. राहुल गांधी म्हणाले होते की ये सूट-बूटकी सरकार आहे. सूट यांचा आणि बूट आम्हाला. पण बूट काय करू शकतो हे आम्ही वेळ आल्यावर दाखवून देऊ.
धारावी कोरोनाशी लढून जिंकली, ती अदानीला शरण जाणार नाही. त्या कोविड काळात सरकारने पात्र-अपात्र केले नाही. मग विकास करताना पात्र-अपात्र ठरवणारे तुम्ही कोण? अपात्रांना मीठागरात टाकण्याचा डाव आहे. मीठागराचा पुनर्विकास करणार. म्हणजे पुन्हा मीठागरही अदानीला देणार. धारावीकरांना 500 चौ. फूट घर मिळालेच पाहिजे. धारावीकरांना जिथल्या तिथे घर मिळाले पाहिजे. रेल्वे लाइनमध्ये अदानीने स्वत:चे घर बांधावे. माझ्या धारावीतल्या बांधवांना रेल्वे लाइनवर घर नको.
धारावीचा विकास सरकारनेच केला पाहिजे. भाजपचे सरकार म्हणजे दलाल आहेत. आतापर्यंत मुंबई महापालिकेची निवडणूक लावलेली नाही. शिवसेना आमच्या मित्राच्या विकासाआड येऊ नये म्हणून माझा पक्ष, चिन्ह चोरले. पण विश्वास कसा चोराल? सरकारकडे कागद, पेन असेल पण रस्त्यांवर आमची अजूनही मालकी आहे.
मुंबईसाठी मराठी माणसांनी रक्त सांडले, त्या लढ्यात भाजपा कुठेही नव्हता. कोणत्याच लढ्यात नसतो, काही विकायची वेळ आली की हे पुढे येतात. भाजपच्या जावयाला आंदण देण्यासाठी मुंबई नाही. याद राखा आमच्या मुंबईला हात लावण्याची हिंमत केली तर. हा प्रश्न केवळ धारावीपुरता मर्यादित नाही. हा मुंबई संपवण्याचा डाव आहे. मुंबईचा विकास आज दिल्लीतून करत आहेत. बिल्डरला मुंबईचा पालकमंत्री केला आहे. धारावीतल्या उद्योगांचे काय करणार, माहिम नेचर पार्क आधीच खिशात घातले आहे. घराला घर दिल्याशिवाय धारावीकरांच्या केसाला सुद्धा धक्का लावू देणार नाही. कोळीवाडे, कुंभारवाड्यांचे सीमंतन करा. व्यवसायाला आवश्यक जागा द्यायला हवी.
विकास करायचाच असेल तर धारावीत गिरणी कामगार, पोलिसांना घरे द्या. गुजरातला जशी सर्व आर्थिक केंद्रे पळवली, तसे आर्थिक केंद्र धारावीत करा. हा इशारा मोर्चा आहे. समझनेवालोंको इशारा काफी है. हा आवाज दिल्ली, अहमदाबाद आणि चेल्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. हा आवाज जर तुमच्या कानापर्यंत पोहोचत नसेल तर कानाखाली आवाज काढल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की धारावीला आम्ही मिनी इंडिया म्हणतो. इथल्या प्रत्येक घरात कोणता ना कोणता उद्योग चालतो. केंद्र सरकारने आधी धारावीची ही ओळख समजून घेतली पाहिजे. टीडीआर घोटाळा केला, त्याआधी एफएसआय देण्याचा प्रयत्न झाले. आम्ही प्रश्न विचारल्यावर टीका होते. आम्हाला विकास हवा आहे, पण तो सरकारने करावा. बीकेसीचे एक्स्टेंशन करायचे, धारावीकरांना बाहेर काढायचे अशी योजना सुरू आहे. धारावी आमची जमीन आहे. तुमच्या फायद्यासाठी नाही.
खासदार विनायक राऊत यांनी आपल्या भाषणातून माहिती दिली की विकासकांना धारावीच्या 90 टक्के टीडीआर शुल्क दिले जाईल. अदानीला विकास करण्यासाठी 17 वर्षांची मुदत दिली आहे. अदानी समूहाला अनेक प्रकारची शुल्के माफ केली आहे, सवलती, करलाभ दिले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीने अदानीचे पाय धुवायला सुरू केले आहे, ते पाहता धारावीकरांना केवळ 300 चौ. फुटांचीच जागा मिळणार असे दिसत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top