पंतप्रधान शिवजयंतीला मुंबईत कोस्टल रोडचे उद्घाटन करणार

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राज्यातील दौरे वाढले आहेत. येत्या 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या मुहुर्तावर पंतप्रधान मुंबईत येणार असून, या दिवशी ते मुंबईच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करणार आहेत. हा पहिला टप्पा वरळी ते मरीन ड्राईव्हपर्यंत 10 किलोमीटरचा आहे. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काम पूर्ण न झालेला कोस्टल रोड सुरू करत असल्याबद्दल ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे.
मुंबईचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला कोस्टल रोड अंतिम टप्प्यात आला असून, त्याचा पहिला टप्पा 19 फेब्रुवारीला सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोस्टल रोडचे उद्घाटन होणार आहे. कोस्टल रोडमुळे मुंबईकरांना वाहतुकीपासून दिलासा मिळणार आहे. 10 किलोमीटरहून अधिकचा प्रवास अवघ्या 10-12 मिनिटांत करता येईल. कोस्टल रोडची एकूण लांबी 29.2 किलोमीटर असून त्याचे काम दोन टप्प्यात केले जात आहे. संपूर्ण कोस्टल रोड तयार झाल्यानंतर 30 ते 40 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. पहिल्या टप्प्यात 10.58 किलोमीटरचा पूल, तर 2.4 किमी लांबीचा सागरी बोगदा बांधण्यात आला आहे. कोस्टल रोडचा पहिला टप्पा वरळी ते मरीन ड्राईव्हपर्यंत जाणार आहे. मरीन ड्राईव्ह ते प्रियदर्शनी पार्कपर्यंत दोन बोगदे आहेत, जे एकूण 4 किमीसाठी प्रत्येकी 2 किमी लांबीचे आहेत. एकूण 13,898 कोटी रुपयांच्या प्रकल्पात आतापर्यंत 9,383 कोटी रुपयांची कामे झाली आहेत. कोस्टल रोडचे 84 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असल्याचा राज्य सरकारचा दावा आहे.
कोस्टल रोडचे वैशिष्ट्य म्हणजे या मार्गावरील बोगदे आणि मावळा बोअरिंग टनेल मशीन. मुंबईतील प्रियदर्शनी पार्क येथे दोन भुयारी मार्ग उभारले आहेत. या बोगद्यात दोन्ही बाजूंना प्रत्येकी तीन-तीन मार्गिका असतील. बोगदा खणण्यासाठी आणलेल्या टीबीएम मशिनला ‘मावळा’ हे नाव देण्यात आले होते. मुंबईच्या जमिनीखाली 10 ते 70 मीटर खोल दोन बोगदे खोदले गेले. मावळाच्या मदतीने हे भूमिगत मार्ग तयार करण्यात आले आहेत.
दरम्यान, उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी कोस्टल रोडवरून राज्य तसेच केंद्र सरकारवर टीका केली आहे. ‘कोस्टल रोड आणि मुंबईशी अजिबात देणेघेणे नसलेल्या महाराष्ट्राची सत्ता बेकायदेशीररित्या बळकावणारे आणि मुंबईची लूट करणारे राजकारणी या अर्धवट काम राहिलेल्या कोस्टल रोडचे उद्घाटन करून निवडणुकीत श्रेय घेऊ पाहतील. काम पूर्ण न झालेला कोस्टल रोड सुरू करणे ही अत्यंत चुकीची गोष्ट ठरेल. पण राजकारणच करू पाहणार्‍यांकडून दुसरी तरी काय अपेक्षा करणार? मुंबईचा वापर राजकारणासाठी केला जात आहे, ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे, अशी पोस्ट आदित्य ठाकरे यांनी आज त्यांच्या एक्स अकाउंटवर केली आहे.

कसा आहे कोस्टल रोड प्रकल्प?
प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते प्रियदर्शनी पार्क, प्रियदर्शनी पार्क ते बडोदा पॅलेस, बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सी-लिंक अशा तीन टप्प्यांत विभागला आहे. मरीन ड्राईव्ह ते वरळी वांद्रे सी लिंकपर्यंत तीन इंटरचेंज आहेत. पहिला इंटरचेंज एमर्सन गार्डन, दुसरा इंटरचेंज हाजी अली आणि तिसरा इंटरचेंज वरळी येथे आहे. इंटरचेंजच्या दरम्यान पार्किंगची व्यवस्थाही करण्यात आली आहे. एकूण अठराशे वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top